
कारकिर्दीतील ३६ वे विजेतेपद पटकावले
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी आणि स्टार स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. पंकजचे हे त्याच्या कारकिर्दीतील ३६ वे राष्ट्रीय आणि १० वे पुरुष स्नूकर जेतेपद आहे.
‘ओएनजीसी‘चे प्रतिनिधित्व करणाऱ्या अडवाणीने खराब सुरुवातीनंतर स्वतःला सावरत अंतिम सामन्यात ब्रिजेश दमानी याला पराभूत केले. दमानीने पहिली फ्रेम जिंकून चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर तो अडवाणीच्या बरोबरीची कामगिरी करू शकला नाही.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाईल. अडवाणींनी त्यांच्या कामगिरीत सातत्य आणि अचूकता राखली. एका फ्रेमने पिछाडीवर असूनही त्याने आपला संयम राखला आणि कोणतीही चूक केली नाही. अडवाणीने शेवटच्या फ्रेममध्ये ८४ चा प्रभावी ब्रेक मारून फ्रेम, सामना आणि चॅम्पियनशिप जिंकली.
दमानीने गट फेरीत अडवाणीचा पराभव केला होता पण अंतिम फेरीत अनुभवी खेळाडूविरुद्ध त्याला आपला लय कायम राखता आला नाही. अडवाणीला दमानीविरुद्धच्या गट फेरीच्या सामन्यात फक्त एकच फ्रेम जिंकता आली. आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल ज्यामध्ये अडवाणी आणि दमानी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अडवाणी म्हणाला की, ‘अजिंक्यपद जिंकल्यानंतर ही एकमेव स्पर्धा होती ज्याच्या कामगिरीच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय प्रतिनिधींची निवड केली जाईल. त्यामुळे, या स्पर्धेत बरेच काही धोक्यात होते. इथे सुवर्णपदक जिंकणे खूप छान वाटते. स्पर्धेत एका टप्प्यावर मी बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होतो. मग मला कळले की या महत्त्वाच्या क्षणाचा अर्थ काहीतरी मोठा असावा. बिलियर्ड्स आणि स्नूकर या दोन्ही खेळांमध्ये पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद आहे.’