
छत्रपती संभाजीनगर संघाला १०३ धावांची आघाडी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर पुरुष लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने विजय सीनियर संघावर १०३ धांवांची आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे. आदर्श जैन (२१९) आणि आनंद ठेंगे (१२५) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ९० षटकात सात बाद ४४७ धावसंख्या उभारली.
एमसीए क्रिकेट मैदान २ वर हा सामना होत आहे. विजय सीनियर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत पहिल्या डावात ७२.२ षटकात सर्वबाद ३४४ धावसंख्या उभारली. त्यात मिझान सय्यद याने सर्वाधिक १२३ धावा काढल्या. हरी सावंत (५४) व दिलीप यादव (५५) यांनी अर्धशतके ठोकली. छत्रपती संभाजीनगर संघाकडून आनंद ठेंगे याने ८४ धावांत सात विकेट घेत सामना गाजवला. योगेश चव्हाण याने ७७ धावांत दोन गडी बाद केले.
छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ९० षटके फलंदाजी करत सात बाद ४४७ धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आदर्श जैन व सागर पवार या सलामी जोडीने ९७ धावांची भागीदारी करुन संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. सागर पवार चार षटकार व सहा चौकारांसह ६० धावा काढून बाद झाला. त्यानंतर सुरज गोंड (०), धीरज बहुरे (०) हे आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले.
आदर्श जैन आणि आनंद ठेंगे या जोडीने चौथ्या विकेटसाठी ३१८ धावांची भागीदारी करुन सामन्याचे चित्र बदलून टाकले. आनंद ठेंगे याने १६६ चेंडूंचा सामना करत १२५ धावांची बहारदार खेळी साकारली. त्याने दोन षटकार व दहा चौकार मारले. आदर्श जैन याने २५१ चेंडूत २१५ धावांची वादळी खेळी करत द्विशतक साजरे केले. आदर्श याने ३४ चौकार व तीन षटकार ठोकले. आदर्श व आनंद यांच्या फलंदाजीने छत्रपती संभाजीनगर संघाने आघाडी मिळवण्यात यश मिळवले. ही जोडी बाद झाल्यानंतर आकाश विश्वकर्मा (३) लवकर बाद झाला. ऋषिकेश नायर (नाबाद ३) व योगेश चव्हाण (नाबाद ११) ही जोडी नाबाद राहिली. ९० षटकांच्या खेळात छत्रपती संभाजीनगर संघाने सात बाद ४४७ धावा काढल्या. विजय सीनियर संघाकडून दिलीप यादव याने ५५ धावांत तीन विकेट घेतल्या. आदर्श जैन हा गुरुकुल क्रिकेट अकादमीचा खेळाडू असून त्याला श्रेयस मगर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.