
बाळकृष्ण काशिदची अष्टपैलू कामगिरी
पुणे : येथील विराज क्रिकेट अकादमी मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ पुरुष गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर आणि सांगली संघातील सामना अनिर्णित अवस्थेत संपला. सोलापूर संघाने पहिल्या डावात आघाडी घेण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण केवळ २ धावा कमी पडल्या. पहिल्या डावाच्या आघाडीवर सांगली संघाने बाजी मारली.
सोलापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सांगली संघाची सलामीची जोडी केवळ ५७ धावांत माघारी पाठवल्यानंतर शुभम शितोळे (५०) आणि ओंकार यादव (१२७) यांनी डाव सावरला, तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची तर पाचव्या जोडीची भागीदारी ९९ धावांची करताना सुदीप फाटक (५२) याने अर्धशतक झळकावले.
शेवटच्या सत्रात सांगलीचा पहिला डाव ६७.३ षटकात ३१३ धावांवर संपुष्टात आला. सोलापूर संघाकडून मध्यमगती गोलंदाज बाळकृष्ण काशिद आणि नदीम शेख यांनी प्रत्येकी ४ बळी तर यश साठे व प्रफुल देवकते यांनी १-१ बळी घेतला.
प्रत्युत्तरात सोलापूरच्या पहिल्या डावात दिवस अखेरीला १० षटकात बिनबाद ४३ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सलामीवीर शहानुर नदाफ (३९), आदर्श मनुरे (३५) यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. पण ९७ धावांत सलामीचे ३ गडी बाद झाले आणि तिथून डावाला गळती लागली. पुढील ७० धावांत ४ गडी बाद झाले. सम्यक शहा (७), वैष्णव जावळे (१३), अक्षय पंचारिया (९), यश साठे (८) हे बाद झाल्यावर निखिल दोरनाल (६२) याने केवळ ५५ चेंडूत जलद अर्धशतक करत अष्टपैलू खेळाडू बाळकृष्ण काशिद सोबत आठव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. निखिल बाद झाल्यावर बाळकृष्ण याने नदीम शेख (२२) सोबत ५७ धावांची भागीदारी करताना ४ चौकार ४ षटकार लगावत ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले. २९१ धावांवर नदीम बाद झाल्यावर सोलापूरला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी २२ धावांची गरज होती आणि बाळकृष्ण खेळपट्टीवर होता व शेवटचा फलंदाज प्रफुल याच्यासोबत बाळकृष्ण याने फटकेबाजी केली. ७ चौकार आणि ७ षटकार ठोकत ८५ धावा करून पहिल्या डावात बरोबरी साधण्यासाठी केवळ २ धावांची गरज असताना बाळकृष्ण बाद झाला आणि सोलापूरचा पहिला डाव ३११ धावांवर संपुष्टात आला.
सांगली संघाकडून पार्थ पाटील याने १, निखिल कदम, रणजीत चौगुले, यश किरदात यांनी प्रत्येकी २ तर सौरभ शिंदे याने ३ बळी घेतले. सोलापूरचा डाव संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला. सोलापूरचा पुढचा सामना १३ तारखेला नेहरू स्टेडियमवर होणार आहे.