चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतून जसप्रीत बुमराह बाहेर 

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

भारतीय संघाला मोठा धक्का; हर्षित राणा, वरुण चक्रवर्तीला मोठी संधी 

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आा फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी अद्ययावत संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीला १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे, तो यशस्वी जैस्वालच्या जागी संघात सामील होईल. बीसीसीआयने मोहम्मद सिराज, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सहभागी आठही संघांना अंतिम संघांची यादी मंगळवारपर्यंत म्हणजेच ११ फेब्रुवारीपर्यंत सादर करायची होती. बीसीसीआयने त्यांच्या अंतिम संघात दोन बदलांसह १५ सदस्यीय संघाची यादी आयसीसीला सादर केली. यामध्ये दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह याला संघातून बाहेर पडावे लागले आहे आणि यशस्वी जैस्वाल याला राखीव खेळाडूत स्थान देण्यात आले आहे. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

बुमराहची अनुपस्थितीने भारताला मोठा धक्का
गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या भारताच्या १५ सदस्यीय प्राथमिक संघात बुमराहचा समावेश होता. परंतु तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नाही. सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराहला दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो एकही सामना खेळू शकलेला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. वेगवान गोलंदाजाच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

हर्षित-वरुण यांना पदार्पणाची संधी 
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात राणाने पदार्पण केले आणि आतापर्यंत मालिकेतील दोन्ही सामने खेळले आहेत आणि मधल्या षटकांमध्येही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीलाही भारताने पदार्पणाची संधी दिली.

२३ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने 
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला अ गटात स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचाही समावेश आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार खेळेल. आठ संघांच्या या स्पर्धेत १५ सामने होतील. ही स्पर्धा १९ दिवस चालेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना २३ फेब्रुवारी (रविवार) रोजी खेळला जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *