
सालार जंग टी २० क्रिकेट स्पर्धा
मुंबई : कर्णधार ओंकार जाधवच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर कुर्ला स्पोर्ट्स क्लब संघाने (केएससी) ७५व्या सालार जंग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत यंग फ्रेंड्स सीसीचा ८ विकेटने पराभव करत शानदार विजय मिळवला.
इस्लाम जिमखाना मैदानावर कोडिया ग्रुपच्या वतीने आयोजित या स्पर्धेत यंग फ्रेंड्स सीसीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १६२ धावा केल्या. निनाद कदमने ३५ आणि नितेश रायने ३४ धावा करत संघाचा डाव सावरला. केएससीकडून आयुष रघुवंशीने ३, तर आशय दुबे आणि ओंकार जाधवने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओंकार जाधवने केवळ ५२ चेंडूंत नाबाद १०० धावा करत सामना एकतर्फी केला. त्याच्या खेळीत १६ चौकार आणि २ षटकार होते. त्याला जयेश चंदनकरने ४३ धावांची चांगली साथ दिली. केएससीने हे लक्ष्य १६.१ षटकांत २ विकेटच्या बदल्यात सहज पार केले.
पोलीस जिमखान्याचा रोमांचक विजय
या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात पोलीस जिमखान्याने अवघ्या २ धावांनी मॉडर्न क्रिकेटवर रोमांचक विजय मिळवला. पोलीस जिमखान्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या. हर्ष आघावने ६८, तर निसार शेखने ३२ धावा करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रतिसादात मॉडर्न क्रिकेटने जोरदार झुंज दिली पण त्यांच्या फलंदाजांना अंतिम टप्प्यात अपयश आल्याने संघ २० षटकांत ८ बाद १८८ धावांवरच थांबला.