मिडलाईन, मुंबई पोस्टल, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धा 

 
मुंबई : राजाभाऊ देसाई स्मृती चषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मुंबई पोस्टलने अखेरच्या क्षणी मुंबई महानगरपालिकेवर अवघ्या २ गुणांनी रोमांचक विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. आता मुंबई पोस्टलचा सामना मिडलाईन अॅकॅडमीशी होणार असून दुसऱ्या उपांत्य फेरीत ठाणे महापालिका आणि रुपाली ज्वेलर्स आमनेसामने भिडतील.

चवन्नी गल्लीत रंगला थरारक सामना
प्रभादेवीच्या जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरू असलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. साखळी फेरीत सर्व सामने जिंकणारे मुंबई महानगरपालिका, आयएसपीएल आणि मुंबई बंदर हे बलाढ्य संघ बाद फेरीत पराभूत झाले, तर केवळ एक सामना जिंकून बाद फेरी गाठणाऱ्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोस्टल यांच्यातील सामना कमालीचा चुरशीचा ठरला. मनमीत कुमार आणि विशाल कुमारच्या प्रभावी खेळाच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेन हाफटाइमला २१-१९ अशी आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात अभि भोजने आणि मयूर शेख यांनी अप्रतिम खेळ करत मुंबई पालिकेची आघाडी मोडीत काढली. सामना शेवटच्या चढाईपर्यंत रंगला, मात्र मुंबई पोस्टलने ४०-३८ असा थरारक विजय मिळवला.

रुपाली ज्वेलर्सचा सहज विजय
दुसऱ्या लढतीत रुपाली ज्वेलर्सने त्रिमूर्ती एंटरप्रायझेसवर सहज वर्चस्व मिळवत ४३-२३ असा मोठा विजय नोंदवला. सतपाल कुमावत आणि खेमचंद भोई यांच्या अचूक खेळामुळे सामना एकतर्फी ठरला.

मिडलाईन अॅकॅडमीचा दणदणीत विजय
स्पर्धेतील संभाव्य विजेता मानल्या जाणाऱ्या आयएसपीएल संघाने बाद फेरीत कबड्डी प्रेमींना निराश केले. रायगडच्या मिडलाईन अॅकॅडमीच्या धीरज बैलमारे आणि प्रफुल्ल झावरेच्या वेगवान चढाया व पकडींनी आयएसपीएलला पहिल्या सत्रातच नामोहरम केले. मध्यंतराला मिडलाईनने २९-११ अशी विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर मिडलाईनने आपली रणनीती बदलत बचावात्मक खेळ केला आणि अखेर ४६-२७ असा दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.

ठाणे महापालिकेची प्रभावी कामगिरी
ठाणे महानगरपालिकेने मुंबई बंदरवर ३९-३१ असा विजय मिळवत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले.


उपांत्य फेरी लढती

मुंबई पोस्टल विरुद्ध मिडलाईन अॅकॅडमी

ठाणे महापालिका विरुद्ध रुपाली ज्वेलर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *