
रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा
नागपूर : विदर्भ संघाने तामिळनाडू संघावर १९८ धावांनी सहज विजय मिळवत रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता उपांत्य सामन्यात विदर्भ संघाचा सामना मुंबई संघाशी होणार आहे. हा सामना नागपूर येथेच होणार आहे.
विजयासाठी ४०१ धावांचे लक्ष्य असताना तामिळनाडूचा संघ वाईटरित्या अपयशी ठरला आणि दोन सत्रात २०२ धावांतच त्यांचा डाव संपुष्टात आला. त्यामुळे विदर्भ संघा एक दिवस शिल्लक असताना मोठा विजय साकारत उपांत्य फेरीत प्रवेश केला. १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होईल. गेल्या हंगामात दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते.
पहिल्या डावात केलेल्या उत्तम शतकासाठी करुण नायरला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. व्हीसीए सिव्हिल लाईन्स स्टेडियमवर विदर्भाने चौथ्या दिवशी सकाळी पाच बाद १६९ धावांवर आपला दुसरा डाव पुन्हा सुरू केला आणि त्यांची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. यश राठोड आणि हर्ष दुबे यांनी सहाव्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर दुबे ६४ धावांवर बाद झाला. दुबेचे हे सलग चौथे अर्धशतक होते. त्याने पहिल्या डावात ६९ आणि मागील सामन्यात हैदराबादविरुद्ध ६५ आणि ५५ धावा केल्या होत्या.
यश राठोड शेवटपर्यंत खेळत राहिला.यश ठाकूरने त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे यश राठोडला त्याचे शतक पूर्ण करता आले. तो ११२ धावांवर बाद होणारा शेवटचा खेळाडू होता.
शेवटच्या डावात ४०० धावांचा पाठलाग करणे कधीच सोपे नव्हते. तामिळनाडूच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत आपल्या विकेट गमावल्या. त्यामुळे सामना विदर्भाच्या बाजूने झुकला. तामिळनाडूचा अर्धा संघ फक्त ४५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. नचिकेत भुते यांनी पाचपैकी तीन बळी घेतले.
पहिल्या डावात ४८ धावा काढल्यानंतर प्रदोष रंजन पॉलने अर्धशतक (५३) झळकावले. सोनू यादवने सर्वाधिक ५७ धावा केल्या आणि शेवट येईपर्यंत तमिळनाडूचा डाव २०२ च्या पुढे खेचला.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : पहिला डाव : १२१.१ षटकात सर्वबाद ३५३ (ध्रुव शोरे २६, दानिश मालेवार ७५, अक्षय वाडकर २४, करुण नायर १२२, हर्ष दुबे ६९, सोनू यादव ३/९१, विजय शंकर ३/७५).
तामिळनाडू : पहिला डाव ६४.३ षटकांत २२५ (आंद्रे सिद्धार्थ ६५, प्रदोष रंजन पॉल ४८, सोनू यादव ३२, आदित्य ठाकरे ५/३४, नचिकेत भुते २/५४, यश ठाकूर २/७८).
विदर्भ : दुसरा डाव ९२.३ षटकांत सर्वबाद २७२ (करुण नायर २९, यश राठोड ११२, हर्ष दुबे ६४, साई किशोर ५/७८, अजित राम २/३३).
तामिळनाडू : दुसरा डाव ६१.१ षटकांत सर्वबाद २०२ (प्रदोष रंजन पॉल ५३, सोनू यादव ५७; नचिकेत भुते ३/१७, हर्ष दुबे ३/४०).