मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये डबल धमाका, मयंकला सुवर्ण, सौरभला कांस्य

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सलग तिसर्‍या दिवशीही सुवर्णयशाची धडाकेबाज कामगिरी केली. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयंक चाफेकर याने सुवर्णपदकाची बाजी मारली. पाठोपाठ सांघिक गटात महाराष्ट्र संघाने अव्वल स्थान पटकावले. वैयक्तिक प्रकारातील कांस्यपदकही महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने जिंकले.

गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग तिसर्‍या दिवशीही महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. टेट्रार्थलॉन प्रकारात ठाणेच्या मयंक चाफेकर याने ११२६ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. हरियाणाच्या बसंत तोमरने १०७६ गुणांसह रौप्य पदक तर जिंकले तर महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने १०६५ गुणांची कमाई करीत कांस्यपदक जिंकले.

२०० मीटर जलतरण, तलवारबाजी, १६०० मीटर धावणे, लेझर नेमबाजी व ६०० मीटर धावणे असा हा दमछाक व कौशल्यपूर्ण प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसर्‍यांदा सुवर्णपदक पटकवले. गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकाची लयलूट केली होती.

टेट्रार्थलॉन सांघिक प्रकारातही महाराष्ट्राचा संघ अव्वल राहिला. मयंक चाफेकर, सौरभ पाटील व जय लवटे त्रिमूर्तींनी ३१७९ गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. रौप्यपदक गोवा तर कांस्य पदक हरियाणा संघाला मिळाले. मयंक व सौरभचे हे स्पर्धेतील सलग तिसरे पदक आहे. ट्रायथले शर्यतीत मयंक याने कांस्य पदक तर कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने बायथले प्रकारात रूपेरी यश संपादन केले होते. पदक विजेत्या संघाला शेखर खासनीस व घनश्याम कुवर, आहिल्या चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राचे उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे व आंतरराष्ट्रीय खेळाडू विरज परदेशी यांनी हस्ते विजेत्यांना पदके बहाल करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *