निवड समितीने युवा खेळाडूंवर दाखवला विश्वास
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा भारतीय संघात हवा होता. पुजारासाठी गंभीर आग्रही होते. परंतु, हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. निवड समितीने या मालिकेसाठी बहुतेक युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला. या मालिकेत भारतीय संघ सध्या १-२ ने मागे पडला आहे. त्यामुळे चोहोबाजूने भारतीय संघावर टीका होत आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार गौतम गंभीरला पुजाराला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेसाठी भारतीय संघात सामील करायचे होते. पण तसे झाले नाही. पुजाराचा संघात समावेश करण्यासाठी निवडकर्त्यांनी गंभीरचे ऐकले नाही. पर्थमधील मालिकेतील पहिली कसोटी जिंकल्यानंतरही गंभीर पुजाराच्या समावेशाबद्दल बोलला होता असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चेतेश्वर पुजाराने भारतीय संघासाठी १०० हून अधिक कसोटी खेळल्या आहेत. २०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने भारतीय संघासाठी शेवटची कसोटी खेळली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुजाराने दोन्ही डावात १४ आणि २७ धावा केल्या.
२०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या होत्या. पुजाराने १२५८ चेंडूत ५२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुजाराने २७१ धावा केल्या होत्या. पंतनंतर या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू होता.
चेतेश्वर पुजारा २०२४-२५ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळत नसल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने आनंद व्यक्त केला होता. हेझलवूड म्हणाला होता की, ‘पुजारा येथे नसल्याचा मला आनंद आहे. तो असा आहे की जो फलंदाजी करतो आणि क्रिझवर बराच वेळ घालवतो आणि प्रत्येक वेळी तुमची विकेट मिळवतो. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे तिथे संघात नेहमीच प्रथम श्रेणीचे युवा खेळाडू असतात.’