
एमसीए सचिव कमलेश पिसाळ यांची माहिती
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या एमसीए निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सर्व खेळाडूंना सहभाग घेणे अनिवार्य आहे असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्हा क्रिकेट संघ व सर्व क्लब यांना कळवण्यात येत आहे की, ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, दुखापत, भारतीय संघात निवड झाली असल्यास, आयपीएल व इतर कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींमुळे कोणत्याही विशिष्ट परवानगीमुळे सूट मिळाल्याशिवाय सर्व खेळाडूंना एमसीए निमंत्रित सामन्यांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.
सर्व जिल्हा क्रिकेट संघटनांनी सर्व राज्य खेळाडूंना त्यानुसार माहिती दिली पाहिजे आणि संघटनेच्या क्रिकेट सामन्यांविषयी, त्यांच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून या सामन्यांमध्ये त्यांचा सहभाग सुनिश्चित केला पाहिजे असे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले आहे.
एकदा एखादा खेळाडू कोणत्याही विशिष्ट वयोगटातील स्पर्धेसाठी क्लब, जिल्हाकडे नोंदणी करतो, तेव्हा तो त्या वयोगटातील सर्व स्वरुपांसाठी म्हणजेच टी २०, दोन दिवसीय, ५० षटकांसाठी त्या क्लब अथवा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यास बांधिल असतो असे सचिव कमलेश पिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.
वयोगटातील फसवणुकीविरुद्ध कडक कारवाई
काही खेळाडू त्यांच्या पात्र श्रेणीबाहेरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांचे वय चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. जर कोणताही खेळाडू वयाच्या गैरव्यवहारात दोषी आढळला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा सचिव कमलेश पिसाळ यांनी दिला आहे. सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंच्या कागदपत्रांची पडताळणी आणि सत्यता सुनिश्चित करण्याची जबाबदारी क्लब आणि जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे असे सचिव कमलेश पिसाळ यांनी सांगितले आहे.