मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवीची सुवर्ण हॅटट्रिक, रूपालीला रौप्य

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

महिलांच्या गटात महाराष्ट्राला सांघिक रौप्य

खतिमा : जिम्नॅस्टिक्स पाठोपाठ मराठमोळ्या मल्लखांबतही महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवले आहे. दोरीचा मल्लखांब प्रकारात जान्हवी जाधवने सुवर्ण, तर रूपाली गंगावणे हिने रूपेरी यशाला गवसणी घातली. मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने रौप्य पदकाची कमाई करीत आजचा दिवस गाजविला.

वन चेतना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या मल्लखांब स्पर्धेत पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा बोलबोला सुरू आहे. दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबई उपनगरच्या जान्हवी जाधव हिने आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करून सुवर्ण यशाची भरारी घेतली. विश्वकरंडक चॅम्पियन असणार्‍या जान्हवीने कलात्मक प्रदर्शन करीत अवघड रचना सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. ८.६५ गुणांची कमाई करीत सलग तिसर्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जान्हवीने आपल्या यशाचा झेंडा फडकविला. मुंबईतील विलेपार्ले श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेत सराव करणार्‍या जान्हवीने अहमदाबाद स्पर्धेत १ सुवर्ण, ३ रौप्य तर गत गोवा स्पर्धेत १ सुवर्ण, १ कांस्य पदकाची लयलूट केली होती. वयाच्या ११ व्या वर्षापासून द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरूखकर यांच्या मार्गदर्शन तिला लाभत आहे.

दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबईच्या खेळाडूंचा डंका वाजला. स्पर्धेत वयाने सर्वात मोठी असणारी २७ वर्षीय रूपाली गंगावणे हिने रूपेरी यश संपादले. चेंबुरमधील टमलिंग अ‍कादमीत ८ तास सराव करणार्‍या रूपालीने ८.४५ गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा पदकाची हॅटट्रिक केली. अहमदाबादमधील स्पर्धेत ३ सुवर्ण, १ कांस्य, तर गत गोवा स्पर्धेत रूपालीने सुवर्ण चौकार झळकविला होता.

महिलांच्या सांघिक प्रकारात जान्हवी जाधव, नेहा क्षीरसागर, निधी राणे, पल्लवी शिंदे, प्रणाली मोरे व रूपाली गंगावणे यांनी ८२.८५ गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. ८३.२० गुण संपादून मध्य प्रदेश संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *