
देहरादून : महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक स्पर्धेत पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. एरोबिक्समध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली.
भागीरथी संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्य शहा, स्मित शहा व रामदेव बिराजदार यांनी पुरुषांच्या तिहेरी गटात १७.२५ गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. याचबरोबर महाराष्ट्राने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. सांघिक गटात संदेश चिंतलवाड, स्मित शहा, अभय उंटवाल, उदय मधेकर, विश्वेश पाठक यांनी १६.६० गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकून दिले.
याचबरोबर पुरुष एकेरी आर्य शहाने १८.०५ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. महिला एकेरीत गौरी ब्राह्मणे हिने १५.७५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. मिश्र दुहेरी श्रीपाद हराळ व मानसी देशमुख यांनी १५.२० गुणांसह महाराष्ट्राला कास्यपदक जिंकून दिले.