चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी भारताने इंग्लंडला ३-० ने हरवले 

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १४२ धावांनी विजय, शुभमन गिलचे आक्रमक शतक 

अहमदाबाद : शुभमन गिल (११२), विराट कोहली (५२), श्रेयस अय्यर (७८) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाचा १४२ धावांनी पराभव केला. या दणदणीत विजयासह भारताने मालिका ३-० अशी जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी रोहित, विराट, राहुल या फॉर्म हरवलेल्या फलंदाजांना गवसलेला सूर ही भारतासाठी चांगली गोष्ट झाली आहे. 

इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाने ५० षटकात सर्वबाद ३५६ अशी भक्कम धावसंख्या उभारली. दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने धमाकेदार शतक झळकावले होते. परंतु, या सामन्यात रोहित केवळ १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली या जोडीने बहारदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करुन डावाला आकार दिला. 

गेल्या काही सामन्यांत कमालीचा अपयशी ठरत असलेल्या विराट कोहली याने या सामन्यात आक्रमक फटकेबाजी करत ५५ चेंडूत ५२ धावा फटकावल्या. अर्धशतकी खेळी करताना कोहली याने एक षटकार व सात चौकार मारले. या अर्धशतकाने विराट कोहलीला पुन्हा फॉर्म गवसला असे म्हणावे लागेल आणि भारतीय संघासाठी ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. 

कोहली बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या जोडीने धावांचा वेग कायम ठेवत तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल याने आक्रमक शतक ठोकले. गिल याने १०२ चेंडूत ११२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने तीन षटकार व १४ चौकार मारले. शुभमन बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर ६४ चेंडूत ७८ धावा काढून बाद झाला. आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात अय्यरने आपली विकेट गमावली. त्याने दोन षटकार व आठ चौकार मारले. 
केएल राहुल याला अलीकडे फॉर्म गवसत नव्हता. राहुलने २९ चेंडूत ४० धावा फटकावत आपली लय मिळवली. राहुलने एक षटकार व तीन चौकार मारले. त्यानंतर हार्दिक पंड्या (१७), अक्षर पटेल (१३), वॉशिंग्टन सुंदर (१४), हर्षित राणा (१३) यांनी आपले योगदान दिले. भारतीय संघाने ५० षटकात सर्वबाद ३५६ असा धावांचा डोंगर उभारला. 

इंग्लंड संघाकडून लेग स्पिनर आदिल रशीद हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६४ धावांत चार विकेट घेतल्या. मार्क वूड याने दोन गडी बाद केले. 

इंग्लंडचा डाव गडगडला 

भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. फिलिप सॉल्ट (२३) व बेन डकेट (३४) यांनी ६० धावांची सलामी देत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. अर्शदीप सिंग याने सॉल्ट व डकेट या दोघांना बाद करुन इंग्लंडला मोठा हादरा दिला. त्यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडच्या विकेट पडत गेल्या. हर्षित राणाने जोस बटलर (६), हॅरी ब्रूक (१९) यांना क्लीन बोल्ड करुन इंग्लंडच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणली. टॉम बॅटन (३८), जो रूट (२४), लिव्हिंगस्टोन (९), आदिल रशीद (०) हे फलंदाज लवकर बाद झाले.

गस अॅटकिन्सन याने ३८ धावांची झुंजार खेळी केली. त्याने एक षटकार व सहा चौकार मारले. अक्षर पटेल याने त्याला क्लिन बोल्ड करुन विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा डाव ३४.२ षटकात २१४ धावांवर संपुष्टात आला. 

भारताच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावी मारा करत विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग (२-३३), हर्षित राणा (२-३१), वॉशिंग्टन सुंदर (१-४३), अक्षर पटेल (२-२२), हार्दिक पंड्या (२-३८), कुलदीप यादव (१-३२) यांनी संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *