
छत्रपती संभाजीनगर : अमॅच्युयर बॉडी बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या ७४ व्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या शकील इब्राहिम शेख याला तिसरा तर अब्दुल रौफ याला चौथा क्रमांक मिळाला.
अमॅच्युयर बॉडी बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे कोल्हापूर येथे ७४ वी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष मोहसीन अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम कोल्हापूर येथील स्पर्धेत सहभागी झाली होती.
या संघाचे कर्णधार खान मुहम्मद यासर होते आणि संघटनेचे मीडिया प्रमुख शेख नोमान अहमद हे देखील या संघासोबत होते. महाराष्ट्रातील ३०० शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
तसेच ‘औरंगाबाद श्री’ आणि ‘मराठवाडा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मोहसीन अहमद यांनी दिली.