केडीए हॉस्पिटल संघाचा थरारक विजय; उपांत्य फेरीत प्रवेश

  • By admin
  • February 13, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धा

मुंबई : आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेत अंधेरीच्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी (केडीए) हॉस्पिटल संघाने सोमैया हॉस्पिटल संघावर ८ धावांनी रोमांचक विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.

प्रथमेश महाडिक, संकेत किणी, दीपक सिंग आणि डॉ हर्शल वाघ यांच्या दमदार खेळाच्या बळावर केडीए हॉस्पिटलने हा विजय मिळवला. मध्यमगती गोलंदाज दीपक सिंगला ‘सामनावीर’, तर आक्रमक फलंदाज राहुल मोरेलाआउटस्टँडिंग प्लेयरचा पुरस्कार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विराज मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

केडीए हॉस्पिटल संघाची आक्रमक फलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या केडीए हॉस्पिटलच्या सलामी जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. प्रथमेश महाडिकने (४० चेंडूत ३७ धावा) व डॉ हर्शल वाघने (१६ चेंडूत १६ धावा) पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. मात्र, सोमैया हॉस्पिटलच्या फिरकीपटू राहुल मोरेने (२४ धावांत ३ बळी) केडीएचा डाव हादरवला. तरीही संकेत किणी (१६ चेंडूत नाबाद ३५ धावा) आणि अल्केत तांडेल (१५ चेंडूत २० धावा) यांनी तुफान फटकेबाजी करत २० षटकात ६ बाद १३० धावा उभारल्या.

सोमैया हॉस्पिटल संघाचा प्रतिहल्ला
विजयासाठी १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोमैया हॉस्पिटल संघाने अडखळती सुरुवात केली. मध्यमगती गोलंदाज देवेंद्र फणसेने (१८ धावांत ३ बळी) डॉ प्रणित बिक्कड आणि प्रतीक गोरेगावकर याला स्वस्तात तंबूत पाठवले. मात्र, सुशांत गायकवाड (२३ चेंडूत २४ धावा), प्रकाश पुजारी (४१ चेंडूत ३१ धावा) आणि राहुल मोरे (२६ चेंडूत ३४ धावा) यांच्या खेळीमुळे सोमैया हॉस्पिटलने १६व्या षटकात ३ बाद १०६ धावांपर्यंत मजल मारली.

दीपक सिंगची प्रभावी गोलंदाजी
अखेरीस, मध्यमगती गोलंदाज दीपक सिंग (११ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू करण पाटोळे (१६ धावांत २ बळी) यांनी निर्णायक क्षणी झटपट बळी घेत सोमैया हॉस्पिटलचा डाव २० षटकांत ९ बाद १२२ धावसंख्येवर रोखला. केडीए हॉस्पिटलने चुरशीच्या लढतीत ८ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *