
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी रजत पाटीदारला कर्णधार म्हणून नियुक्त केले. विराट कोहलीला पुन्हा एकदा संघाचा कर्णधार बनवले जाईल अशी बरीच चर्चा होती, पण तसे झाले नाही. संघाने पाटीदारकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. पाटीदार २०२१ मध्ये आरसीबीमध्ये सामील झाला. तेव्हापासून तो संघाचा भाग राहिला आहे.
गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसने संघाचे नेतृत्व केले होते. पण आयपीएल २०२५ पूर्वी, संघाने डु प्लेसिसला कायम ठेवले नाही किंवा मेगा लिलावात त्याला पुन्हा विकत घेतले नाही. डू प्लेसिस आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. डू प्लेसिसला दिल्लीने २ कोटी रुपयांना खरेदी केले.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने फक्त तीन खेळाडूंना कायम ठेवले होते आणि त्यात रजत पाटीदारचा समावेश होता. पाटीदारला संघाने ११ कोटी रुपयांना कायम ठेवले. पाटीदार व्यतिरिक्त, एसीबीने विराट कोहली आणि यश दयाल यांना कायम ठेवले होते. कोहलीला २१ कोटी रुपयांना आणि यश दयालला ५ कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले.
नवीन कर्णधार रजत पाटीदारसह चाहत्यांना आयपीएल २०२५ मध्ये पहिले आयपीएल जेतेपद मिळण्याची आशा असेल. पाटीदारने आतापर्यंत आरसीबीसाठी फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली आहे, परंतु आता तो कर्णधार म्हणून संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक असेल.
रजत पाटीदारची आयपीएल कारकीर्द
रजत पाटीदारने २०२१ मध्ये आरसीबीकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पाटीदार आतापर्यंत फक्त आरसीबीचा भाग आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २७ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २४ डावांमध्ये त्याने ३४.७३ च्या सरासरीने आणि १५८.८४ च्या स्ट्राईक रेटने ७९९ धावा केल्या. या काळात त्याने १ शतक आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.