
हरिद्वार : तब्बल दशकानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आखाड्यात महाराष्ट्राने पदकाचा षटकार झळकवला आहे. चमकदार कामगिरी नोंदवताना महाराष्ट्र केसरी विजेत्या कुस्तीपटूंनी देखील ठसा उमटविला. भाग्यश्री फंड पाठोपाठ हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी हे महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकाचे मानकरी ठरले आहेत.

रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात सलग तिसर्या दिवशी महाराष्ट्राचा डंका घुमला. महाराष्ट्र केसरीच्या फ्रीस्टाईल १२५ किलो वजनी गटात हर्षवर्धन सदगीर याने कांस्यपदकावर नाव कोरले. दिल्लीच्या लक्ष्य विरूद्ध झुंजताना नाशिकच्या हर्षवर्धनने तीन गुणांची आघाडी घेतली होती. दुसर्या फेरीत लपेट डावावर चितपट कुस्ती करीत त्याने कांस्य पदक जिंकले.
पुण्यात २०२० साली महाराष्ट्र केसरीची गदा उंचविणार्या हर्षवर्धनचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक होय. याच वर्षी बंगळुरूमधील वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने रूपेरी पदक पटकावले होते. महाराष्ट्र केसरी नंतर दुखापतीवर मात करून तो पुन्हा राष्ट्रीय पदक विजेता ठरला आहे. हर्षवर्धन हा पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील काका पवार यांचा पठ्ठा आहे.
महिलांच्या फ्रीस्टाईल ७६ किलो वजन गटात कोल्हापूरच्या अमृता पुजारीने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. गुजरातच्या सनोफर विरूद्धच्या लढतीत अमृताने सुरुवातीलाच आक्रमण करीत पदकाकडे कूच केली. सनोफरला लपेट डावावर चितपट सलग दुसर्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीने कास्यपदकाचे यश संपादन केले. गतवर्षी २०२४ मध्ये नागपूर येथील महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा तिने जिंकली होती.
कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील या सुवर्णकन्येने बॅकॉक येथे झालेल्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जॉर्डन मधील २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाचा करिश्मा घडविला आहे. मरुगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल प्रशिक्षक दादा लवटे यांचे मार्गदर्शन अमृताला मिळत आहे.
हरिद्वारमधील कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला गटातील ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकणार्या भाग्यश्री फंडने रौप्यपदक कमावले आहे. फ्रीस्टाईल ६२ किलो गटात अहिल्यानगरची भाग्यश्री फडला रौप्य पदकाची मानकरी ठरली. तिनेs महाराष्ट्र केसरीने एकाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा ही पहिलीच वेळ आहे. या यशा बाबत अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार म्हणाले की, ‘मल्लांनी महाराष्ट्र केसरी पुरतेच समाधानी राहू नये. आमचे वस्ताद मामा बिराजदार यांची महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाचा इतिहास घडविला होता. त्यांचा वारसा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र केसरींनी जोपासला आहे. महाराष्ट्र केसरीपेक्षा अधिक महत्त्व हे राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याना प्राप्त झाले पाहिजे.’