महा ओपन एटीपी चॅलेंजर १०० पुरुष टेनिस स्पर्धा रविवारपासून रंगणार

  • By admin
  • February 13, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

भारताच्या मानस धामणे, आर्यन शहा, करण सिंग यांना वाईल्डकार्ड प्रदान

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र सरकार, पीएमसी, पीसीएमसी आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर १०० पुरुष टेनिस स्पर्धेत भारताचे युवा उदयोन्मुख खेळाडू मानस धामणे, आर्यन शहा, करण सिंग यांना मुख्य ड्रॉसाठी वाईल्डकार्ड प्रदान करण्यात आले आहे.
 
पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंटऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी पाच वर्षांचा करार केला असून यामध्ये २८ देशांतील अव्वल खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. ही स्पर्धा  १६ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. भारतातील ४ एटीपी चॅलेंजर मालिकेतील पुण्यात होणारी ही तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा चेन्नई व दिल्ली येथे पार पडल्या असून आगामी स्पर्धा बेंगळुरू येथे होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना एमएसएलटीएचे प्रशांत सुतार व सुंदर अय्यर यांनी सांगितले की, ‘भारतीय खेळाडूंना उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची  संधी उपलब्ध करून देणे, हा आमचा मुख्य उद्देश असून त्यासाठीच पीएमआरडीएने या स्पर्धेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना, एमएसएलटीएच्या वतीने आयोजित भारतीय टेनिस कॅलेंडरमधील पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर १०० पुरुष टेनिस स्पर्धा म्हणजे एक मानाचा शिरपेच ठरणार आहे. इतकेच नव्हे तर पुणे महानगराची प्रतिमा जागतिक क्रीडा क्षेत्रात उंचावण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाची भूमिका बजावतात.’

सुतार पुढे म्हणाले की, ‘पीएमआर चॅलेंजर दर्जाची स्पर्धा आयोजित करणे हा एमएसएलटीएच्या महाराष्ट्रातील टेनिस क्षेत्राचा विकास व प्रचार यासाठीच्या दूरदर्शी नियोजनाचा एक भाग असून एल अँड टी मुंबई ओपन डब्लूटीए १ लाख २५ हजार डॉलर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनापाठोपाठ ही स्पर्धा होणार असल्याने त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

स्पर्धेत मागील आठवड्यात मोनॅस्टीर येथे पार पडलेल्या १५००० डॉलर आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या पुण्याच्या १७ वर्षीय मानस धामणे, गतवर्षी आयटीएफ स्पर्धेत सुरेख कामगिरी करणाऱ्या १९ वर्षीय आर्यन शहा, दोन आठवड्यापूर्वी डेव्हिस कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या २१ वर्षीय करण सिंग या भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असल्याचे प्रशांत सुतार आणि सुंदर अय्यर यांनी जाहीर केले.  
 
सुंदर अय्यर म्हणाले की, ‘गेल्या आठवड्यातच एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धेकरिता केवळ १५ वर्षीय वयाच्या माया राजेश्वरणला वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देऊन आम्ही उदयोन्मुख युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी याधीच पावले उचलली आहेत आणि पीएमआर चॅलेंजर स्पर्धेच्या निमित्ताने आगामी आठवड्यातही आणखी काही आश्चर्यकारक निर्णय घेण्याच्या तयारीत आम्ही आहोत. गुणवान खेळाडूंना योग्य संधी योग्य वेळी मिळवून दिल्यास ते खेळाडू वेगाने प्रगती करून पुढची पायरी गाठतात, असा आमचा विश्वास आहे. आम्ही प्रदीर्घ चर्चेनंतर असे निर्णय घेत असतो आणि यावेळीही असे निर्णय घेऊन पुढचे पाऊल टाकण्याचा आमचा निर्धार आहे. त्याच धर्तीवर पीएमआर चॅलेंजर स्पर्धेत केवळ १६ वर्षाच्या अर्णव पापरकर याला पात्रता फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, ‘आणखी एक प्रमुख टेनिस स्पर्धेचे आयोजन करणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. एमएसएलटीएने यंदाच्या मोसमात एकूण ४,२५००० डॉलर (३.७ कोटी रुपये) रोख पारितोषिकाच्या स्पर्धांचे आयोजन केले असून देशातील क्रीडा क्षेत्रात ही रक्कम सर्वाधिक आहे. अर्थात, महाराष्ट्र राज्य शासन व उदयोग क्षेत्राच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य झाले नसते. या सर्व स्पर्धांमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील टेनिसपटूंना निश्चितच फायदा झाला आहे आणि त्यामुळेच आम्ही आमचे हे धोरण यापुढेही कायम ठेवू.’

या स्पर्धेसाठी १३०००० अमेरिकन डॉलर्स पोरितोषिक रक्कम (१.१२ कोटी रुपये) ठेवण्यात आली असून विजेत्याला १०० एटीपी गुण आणि १७६५० डॉलर्स (१५.५० लाख रुपये), तर उपविजेत्याला ६० एटीपी गुण आणि ९ लाख रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत पराभूत होणाऱ्या खेळाडूलाही १२७० डॉलर्स (१.१० लाख रुपये), तसेच पात्रता फेरीतील खेळाडूला ३८० डॉलर्स (३३ हजार) इन्सेन्टिव्ह मिळणार आहे. या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये एकूण ३२ खेळाडूंचा समावेश असून त्यात २३ थेट प्रवेशिका, ३ वाईल्ड कार्ड आणि ६ पात्रतावीरांचा समावेश आहे. पात्रता फेरीत २४ खेळाडू आणि ४ वाईल्ड कार्डचा समावेश आहे.
 
एमएसएलटीए व भारतीय टेनिस समुदायाच्या वतीने पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, पीएमसी आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, पीसीएमसी आयुक्त शेखर सिंग आणि क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे यांनी दिलेल्या पाठींब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
 
उझबेकिस्तानचे आंद्रे कॉर्निलोव्ह हे या स्पर्धेचे एटीपी निरीक्षक असून लीना नागेशकर या मुख्य रेफ्री आणि अमित देशपांडे मुख्य ऑफिशियल म्हणून काम पाहणार आहेत. पीएमआरडीए यांच्या मुख्य प्रायोजकत्व बरोबर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच, बिसलेरी (बेव्हरेज पार्टनर), सुश्रुत हॉस्पिटल (मेडिकल पार्टनर), डनलप (इक्विपमेंट पार्टनर) हे स्पर्धेचे अन्य प्रायोजक भागीदार आहेत. स्पर्धेतील सामने दररोज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून सर्व प्रेक्षकांना विनामूल्य व मुक्त प्रवेश देण्यात येणार आहे. 

मानांकन यादी

व्हीट कोपरीवा (चेक प्रजासत्ताक, १२८), बिली हॅरिस (ग्रेट ब्रिटन, १२९), ट्रिस्टन स्कूलकेट (ऑस्ट्रेलिया, १४७), एल्मर मोलर (डेन्मार्क, १४९), जुरिज रोडिओनोव (ऑस्ट्रिया, १५५), दुजे अजदुकोविक (क्रोएशिया, १५८), ॲलेक्स बोल्ट (ऑस्ट्रेलिया,१६८), ॲलेक्सिस गॅलार्नो (कॅनडा, १७६). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *