
दिया चितळे-स्वस्तिका घोष जोडीला सुवर्ण
देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक कांस्यपदक मिळाले. दिया चितळे व स्वस्तिका घोष या जोडीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये महिला दुहेरीचे सुवर्ण पदक जिंकून दिले. त्यानंतर महिला एकेरीच्या संघर्षपूर्ण अंतिम लढतीनंतर महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर पृथा वर्टीकर हिला कांस्यपदक मिळाले.
महिला दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या जोडीने निथाया श्री मनी व काव्य श्री बैस्सा या तामिळनाडूच्या चजोडीचा ३- २ (६-११, ८- ११, ११-९, ११- ७, ११- ६) असा पराभव करून सुवर्णपदकावर मोहर उमटवली.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिने तामिळनाडूच्या सेलेना हिला कडवी लढत दिली. मात्र, टाळता येण्याजोग्या अनेक चुका केल्यामुळे स्वस्तिकाचा पराभव झाला. तामिळनाडूच्या सेलेनाने ही लढत ११-७, ११-२, ६-११, ७-११, ११-७, ११-९ अशी ४-३ ने जिंकून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
त्याआधी, महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर हिला तामिळनाडूच्या सेलेना हिने ७- ११, १६- १४, ११- ७, ११- ९, ११- ६ असे ४- १ फरकाने हरविले. त्यामुळे पृथा वर्टीकर हिला कांस्यपदक समाधान मानावे लागले.