
हरिद्वार : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बलाढ्य पंजाब संघाला १-० असे पराभूत केले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या गटात मात्र, महाराष्ट्राला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुष गटात महाराष्ट्राने पंजाब संघाविरुद्ध मिळवलेल्या यशाचा शिल्पकार व्यंकटेश केंचे हा ठरला. त्याने ३६ व्या मिनिटाला महाराष्ट्राचा एकमेव गोल नोंदविला. या सामन्यामध्ये पंजाबच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. त्यांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाला तथापि महाराष्ट्राच्या बचाफळीतील खेळाडूंनी त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. कांस्य पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्र संघास मुख्य प्रशिक्षक विक्रम पिल्ले, प्रशिक्षक सागर कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
महिलांच्या कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या झारखंड संघाला शेवटपर्यंत चिवट लढत दिली. मात्र, हा सामना महाराष्ट्राला १-२ असा गमवावा लागला त्यामुळे महाराष्ट्राचे कांस्यपदक हुकले व त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रकडून एकमेव गोल तनुश्री कडू हिने नोंदविला. झारखंड संघाकडून प्रमोदिनी व दिन राणी यांनी गोल केले.