कोल्हापूरच्या स्वाती शिंदेचे सुवर्ण स्वप्न साकार, आदर्शला रौप्य

  • By admin
  • February 13, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

हरिद्वार: कोल्हापूरच्या जिगरबाज स्वाती शिंदे हिने दशकभर उराशी बाळगलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदकाचे स्वप्न उत्तराखंडात साकार केले. आदर्श पाटील याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या यशाचा जल्लोष शेवटच्या दिवशीही घुमला. ५३ किलो वजन गटात स्वाती शिंदेने मध्य प्रदेशच्या पुजा जाट हिला ५-१ गुणांनी नमवून स्पर्धेतील महाराष्ट्रासाठी कुस्तीतील एकमेव सुवर्णयश संपादन केले. उपांत्य फेरीत कुस्तीला २५ सेकंद बाकी असताना दंगल चित्रपटाची आठवण करून देणारा ४ गुणांचा साईट थ्रो मारून स्वातीने हरियाणाच्या ज्योतीला नमवून कुस्ती शौकिनांची मने जिंकली होती.

मध्य प्रदेशची आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पूजा जाट विरुद्ध स्वाती शिंदे हिने कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीमध्ये स्वातीत केवळ १ गुणांनी आघाडीवर होती. दुसर्‍या फेरीमध्ये स्वातीने भारंदाज डावावर सलग ४ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शन स्वातीला मिळत आहे. अंतिम लढतीत तुफानी कुस्ती करीत स्वातीने मैदान गाजवले. 

७४ किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरचा आदर्श पाटील याला सेनादलाच्या जयदीप याच्याकडून १०-० गुणाने पराभूत व्हावे लागले. हरिद्वार येथे संपलेल्या कुस्ती स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य व ६ कांस्य अशी ९ पदकांची लूट महाराष्ट्राच्या मल्लांनी केली. स्वाती शिंदेने सुवर्ण, भाग्यश्री फंड, आदर्श पाटीलने रौप्य, तर अक्षय  डेरे, हर्षवर्धन सदगीर, अमृता पुजारी, हितेश सोनावणे, दिग्विजय भोंडवे, अश्लेशा बागडे, आदर्श पाटील यांनी कांस्य पदकावर नाव कोरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *