
महाराष्ट्राने दबदबा कायम ठेवत मिळवले ऐतिहासिक यश : नामदेव शिरगावकर
देहरादून : महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अहमदाबाद आणि गोवा स्पर्धेनंतर उत्तराखंडमध्ये अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा इतिहासात सुवर्ण हॅटट्रिकची कामगिरी केली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी हा अभिमानास्पद क्षण घोषित करत महाराष्ट्राच्या खेळाडूंना कौतुकाचा सलाम केला.

महाराष्ट्राची पदकांची लयलूट : २०१ पदके
या स्पर्धेत सर्व्हिसेस संघाने ६८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २७ कांस्य अशी एकूण १२१ पदके जिंकून विजेतेपद पटकावले. हरियाणा संघाने तिसरे स्थान मिळवताना १५३ पदके जिंकली. हरियाणाने ४८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५८ कांस्य पदके जिंकली. कर्नाटक (८० पदके, ३४ सुवर्ण, १८ रौप्य, २८ कांस्य) आणि मध्य प्रदेश (८२ पदके, ३३ सुवर्ण, २६ रौप्य, २३ कांस्य) या राज्यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक २०१ पदकांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला. महाराष्ट्र संघाला सर्व्हिसेस संघापेक्षा केवळ १४ सुवर्ण पदके कमी मिळाल्याने विजेतेपद मिळवता आलेले नाही. महाराष्ट्र संघाने रौप्य आणि कांस्य पदक जिंकण्यात सर्व्हिसेस संघाला बरेच मागे टाकले आहे.

देशभरात महाराष्ट्राचा जयघोष!
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या पदकविजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळवत इतिहास घडवला आहे. जवळपास २०० पदकांचा टप्पा पार करणारा महाराष्ट्र हा देशातील एकमेव संघ ठरला असून पुन्हा एकदा जय महाराष्ट्राचा जयघोष संपूर्ण देशात घुमला आहे!’
महाराष्ट्र क्रीडा विश्वासाठी सुवर्णक्षण!
या कामगिरीमुळे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राला मोठी प्रेरणा मिळाली आहे. खेळाडूंच्या जिद्दीला, मेहनतीला आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याला ही यशस्वी कामगिरी लाभली आहे. महाराष्ट्रचा हा विजय भारतीय क्रीडा विश्वात नव्या ऊर्जेने प्रेरणा देणारा ठरला आहे!