
देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या जश मोदी याने तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय खेळाडू जी साथिथन याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला आणि पुरुषांच्या एकेरीत सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या दिया चितळे व स्वस्तिका घोष या जोडीने महिला दुहेरीचे सुवर्ण पदक जिंकून दिले. महिला एकेरीच्या संघर्षपूर्ण अंतिम लढतीनंतर महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर पृथा वर्टीकर हिला कांस्यपदक मिळाले.
पुरुष गटात एकेरीचा सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला. त्यामध्ये जश मोदी याने हा सामना ७-११, ६-११, ११-७, ११-८, १४-१२, ६-११, ११-६ असा जिंकला. पहिल्या दोन गेम्स गमावल्यानंतर मोदीला सूर गवसला. त्याने लागोपाठ तीन गेम्स घेत सामन्यास कलाटणी दिली. तथापि पुन्हा सहाव्या गेममध्ये साथियन खेळावर नियंत्रण मिळवले आणि ही गेम घेत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सातव्या गेम विषयी उत्कंठा निर्माण झाली. मोदी याने टॉप स्पिन फटक्यांचा खेळ करतानाच प्लेसिंगचाही सुरेख खेळ केला. ही गेम घेत त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
त्याआधी, महिला दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिका घोष या महाराष्ट्राच्या जोडीने निथाया श्री मनी व काव्य श्री बैस्सा या तामिळनाडूच्या जोडीचा ३- २ (६-११, ८- ११, ११-९, ११- ७, ११- ६) असा पराभव करून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष हिने तामिळनाडूच्या एस सेलेना हिला कडवी लढत दिली. मात्र, टाळता येण्याजोग्या अनेक चुका केल्यामुळे स्वस्तिकाचा पराभव झाला. तमिळनाडूच्या सेलेनाने ही लढत ११-७, ११-२, ६-११, ७-११, ११-७, ११-९ अशी ४-३ ने जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
त्याआधी, महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या पृथा वर्टीकर हिला तामिळनाडूच्या सेलेना हिने ७- ११, १६- १४, ११- ७, ११- ९, ११- ६ असे ४- १ फरकाने हरविले. त्यामुळे पृथा वर्टीकर हिला कांस्यपदक समाधान मानावे लागले.