
विदर्भ-मुंबई सामना सोमवारपासून नागपूर येथे रंगणार
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी वरुण चक्रवर्ती याचा ऐनवेळी भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे आक्रमक सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले. आता यशस्वी जैस्वाल रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबई संघाकडून खेळणार आहे.
नागपूर येथे मुंबई आणि विदर्भ यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघात यशस्वी जैस्वालचा समावेश करण्यात आला आहे. यशस्वी जैस्वालच्या समावेशामुळे मुंबईच्या फलंदाजी आक्रमणाला चालना मिळेल. त्याच्याकडे सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. तर मुंबईकडे आधीच स्टार खेळाडू आहेत. यामध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर सारखे खेळाडू आहेत. जैस्वालने या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध फक्त एकच सामना खेळला आणि त्यामध्ये तो फक्त ४ आणि २६ धावा करू शकला. या सामन्यातही मुंबई संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
इंग्लंड संघाविरुद्ध पदार्पण
यशस्वी जैस्वाल याने नुकतेच इंग्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले, परंतु पहिल्या सामन्यात तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि २२ चेंडूत फक्त १५ धावा काढू शकला. तर त्याची प्रथम श्रेणी कारकीर्द चमकदार राहिली आहे. आतापर्यंत त्याने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ३७१२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १३ शतके आणि १२ अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने ३३ सामन्यांमध्ये एकूण १५२६ धावा केल्या आहेत.
मुंबई संघाला १७ फेब्रुवारीपासून विदर्भाविरुद्ध रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळायचा आहे. कोलकाता येथे झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईने हरियाणाला १५२ धावांनी हरवले होते. आता मुंबईला उपांत्य फेरीत विदर्भाकडून आव्हान मिळण्याची पूर्ण आशा आहे.
मुंबई संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघा भटकळ, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.