
वृषाली दंडवते यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
पुणे : एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ मनीषा कोंढरे यांना सन २०२४-२५ चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालिका पुरस्कार (शहरी क्षेत्र) तसेच डॉ वृषाली दंडवते यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार (शहरी क्षेत्र) प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारांचे वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६ व्या स्थापना दिन सोहळ्यात संपन्न झाले. उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख अतिथी होते आणि त्यांनी ऑनलाइन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस. बोरमणे, सहसचिव सुरेश शिंदे या पुरस्कार वितरण सोहळ्याचा वेळी उपस्थित होते.
एआयएसएसएमएस सोसायटीचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच खजिनदार अजय पाटील, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विश्वास बाजीराव पाटील आणि व्यवस्थापकीय समिती चेअरमन भगवानराव बाबुराव साळुंखे यांनीही पारितोषिक विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
‘या प्रतिष्ठेच्या कामगिरीचा सम्मान झाल्यामुळे एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची शैक्षणिक, क्रीडा आणि एकूणच विद्यार्थी विकासातील उत्कृष्टतेसाठी अतूट बांधिलकी अधोरेखित होते. संस्थेने सातत्याने नावीन्यपूर्णता, नेतृत्व आणि सर्वांगीण विकासाची संस्कृती जोपासली आहे आणि उच्च स्तरावर मान्यता मिळवली आहे, असे प्राचार्य डॉ डी एस बोरमणे यांनी सांगितले.