महाराष्ट्राने पटकावले सर्वोत्तम राज्य विजेतेपद

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 124 Views
Spread the love

उत्तराखंड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार; ५४ सुवर्णांसह २०१ पदकांची कमाई

हल्दवानी (उत्तराखंड) : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकवणार्‍या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य विजेतेपदाचा करंडक देण्यात आला.

इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रंगला. या दिमाखदार समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सर्वोत्तम राज्य विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी टी उषा, उत्तराखंडच्या क्रीडा मंत्री रेखा आर्या, महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख संजय शेटे, डॉ उदय डोंगरे, विठ्ठल शिरगावकर, सुनील पूर्णपात्रे आदी उपस्थित होते.

उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५४ सुवर्णांसह ७१ रौप्य, ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्र महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले. स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा राज्यातील संघांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला. अहमदाबाद, गोवा पाठोपाठ उत्तराखंड स्पर्धेत महाराष्ट्र देशातील संघांमध्ये अव्वल येण्याची ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केली आहे. सर्व्हिसेस संघाने ६८ सुवर्णांसह १२१ पदकांसह विजेतेपद तर हरियाणा संघाने ४८ सुवर्णांसह १५३ पदकांसह तिसरे स्थान संपादन केले.

तब्बल २७ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॅस्टिक्स खेळात सर्वाधिक १२ सुवर्णांसह २४ पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत. महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक २०१ पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरला आहे, सर्वोत्तम संघाचा मानही आपण पटकविला आहे असे सांगून नामदेव शिरगावकर म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या पदक विजेत्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सलग तिसर्‍यांदा राज्यांच्या संघात अव्वल स्थान संपादन केले आहे. देशात पुन्हा जय महाराष्ट्राचा जयजयकार होत असल्याचा आनंद मोठा आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *