गतविजेत्या आरसीबी संघाचा विक्रमी विजय

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

एलिस पेरी, रिचा घोषची तुफानी फलंदाजी; गुजरात सहा विकेटने पराभूत 

वडोदरा : एलिस पेरी (५७), रिचा घोष (नाबाद ६४) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. गुजरात जायंट्स संघाने २०२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर आरसीबी संघाने १८.३ षटकात चार बाद २०२ धावसंख्या गाठून सहा विकेटने सामना जिंकला. 

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स संघासमोर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान होते. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबी संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्मृती मानधना हिने सलग दोन चौकार ठोकून आक्रमक सुरुवात केली. परंतु, अॅशले गार्डनर हिने तिच्या पहिल्या षटकात स्मृती मानधना (९) व डॅनिएल व्याट डॉज (४) यांना बाद करुन गतविजेत्यांना मोठा धक्का दिला. त्यावेळी आरसीबी संघाची स्थिती दोन बाद १४ अशी बिकट झाली होती. 

एलिस पेरी हिने धमाकेदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकून सामन्यांत रोमांच आणला. राघवी बिस्ट हिने २७ चेंडूत तीन चौकारांसह २५ धावा फटकावत सुरेख साथ दिली. राघवी व एलिस जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. राघवी बाद झाल्यानंतर रिचा घोष मैदानात उतरली. तिला शून्यावर सीमारेषेवर जीवदान लाभले. गुजरात संघाने या लढतीत अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. जवळपास ३-४ झेल त्यांनी सोडले. गुजरातच्या ढिसाळपणाचा फायदा उठवत एलिस पेरीने आक्रमक अर्धशतक साजरे केले. १३व्या षटकात एलिस पेरीची तुफानी खेळी ५७ धावांवर संपुष्टात आली. सायली सातघरे हिला षटकार मारण्याच्या प्रयत्नात पेरी बाद झाली. तिने दोन षटकार व सहा चौकार मारले. 

रिचा घोष हिने २३ चेंडूत बहारदार अर्धशतक ठोकत सामन्यात मोठा रोमांच आणला. रिचा घोष आणि कनिका आहुजा या जोडीने वादळी फलंदाजी करत नाबाद ९३ धावांची भागीदारी करुन गुजरात संघावर विक्रमी विजय साकारला. रिचा घोष हिने अवघ्या २७ चेंडूत नाबाद ६४ धावा फटकावत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. घोषने चार उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. तिने षटकार ठोकूनच संघाच्या रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले. कनिका आहुजा हिने १३ चेंडूत नाबाद ३० धावा फटकावत अप्रतिम साथ दिली. कनिकाने चार चौकार मारले. गार्डनर हिने ३३ धावांत दोन बळी घेतले. तिची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ ठरली.
 
गार्डनरची वादळी फलंदाजी 

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळताच गुजरात जायंट्स संघाने २० षटकात पाच बाद २०१ अशी भक्कम धावसंख्या उभारली. 

लॉरा वोल्वार्ड्ट (६) व दयालन हेमलता (४) यांना स्वस्तात बाद केल्यानंतर स्मृती मानधनाचा निर्णय योग्य ठरण्याची चिन्हे दिसत होती. परंतु, बेथ मुनी आणि कर्णधार अॅशले गार्डनर या जोडीने आक्रमक फलंदाजी करुन संघाची स्थिती भक्कम केली. बेथ मुनी हिने ४२ चेंडूत ५६ धावांची आक्रमक खेळी करत यंदाच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिले अर्धशतक साजरे केले. तिने अर्धशतकी खेळी करताना आठ चौकार मारले. 

अॅशले गार्डनर हिने तुफानी फलंदाजी करत मैदान दणाणून सोडले. गार्डनर हिने अवघ्या ३७ चेंडूत नाबाद ७९ धावांची वादळी फलंदाजी करत गतविजेत्या संघातील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गार्डनर हिने आपल्या धमाकेदार खेळीत आठ उत्तुंग षटकार ठोकले तसेच तीन चौकार देखील मारले. गार्डनरने आठ षटकार ठोकत सामना एकतर्फी केला. डिआंड्रा डॉटिन हिने १३ चेंडूत २५ धावा फटकावत गार्डनरला सुरेख साथ दिली. तिने एक षटकार व तीन चौकार मारले. सिमरन शेख हिने पाच चेंडूत ११ धावा फटकावताना एक चौकार व एक षटकार मारला. हरलीन देओल हिने ४ चेंडूत दोन चौकारांसह नाबाद ९ धावा फटकावत संघाला २०१ धावसंंख्या उभारुन दिली. 

रॉयल चॅलेंजर्स संघाकडून रेणुका सिंग हिने २५ धावांत दोन विकेट घेतल्या. कनिका आहुजा (१-१९), जॉर्जिया वेअरहॅम (१-५०), प्रेमा रावत (१-२६) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *