
६८५ पदकांची कमाई
पुणे : एन्ड्युरन्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक ६८५ पदकांची लयलूट करत विजेतेपद पटकावले. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले अशी माहिती एन्ड्युरन्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी दिली.
खोपोली येथे एन्ड्युरन्स राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंगेश चिवटे यांच्या हस्ते एन्ड्युरन्स या खेळाच्या रुल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सर्व सहभागी संघांनी बँड पथक तालावर पथसंचलन केले.
या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, केरळ, गोवा या राज्यातील ८०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रा्चया खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.
मंगेश चिवटे यांच्या हस्ते पथ संचालनात सहभागी असलेल्या विशेष खेळाडूंचा सत्कार केला व एन्ड्युरन्स खेळाला भारतीय ऑलिम्पिक संघटना व स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता मिळवून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
एन्ड्युरन्स राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले होते. त्यासाठी भारतीय संघटनेचे चीफ रेफ्री दशरथ बंड यांनी मोलाचे सहकार्य केले. या पुढील स्पर्धेच्या आयोजना संदर्भात आणि राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन खोपोली येथे आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रीय संघटनेचे सेक्रेटरी संदीप सोलंकी यांनी दिली.
या स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय एन्ड्युरन्स स्पर्धेसाठी झाली आहे, असे एन्ड्युरन्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी जाहीर केले व सर्व खेळाडू, ऑफिशियल्स, पालक, प्रशिक्षक यांचे आभार व्यक्त केले. या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून ‘स्पोर्ट प्लस’ यांनी काम पाहिले. तसेच जीविशा पेन क्लिनिक पुणे यांनी वैद्यकीय सहकार्य केले.