
पुढील राष्ट्रीय स्पर्धा मेघालय येथे होणार
देहरादून (उत्तराखंड) : २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात सांगितले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पी टी उषा यांनी पुढील राष्ट्रीय स्पर्धेचे यजमान राज्य मेघालयाचे मुख्यमंत्री संगमा यांना ध्वज सुपुर्द केला.
आपल्या भाषणात अमित शाह यांनी २०३६ मध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या भारताच्या दाव्याचा उल्लेख करत म्हटले की, ‘मी आज असे म्हणू शकतो की भारताचे क्रीडा क्षेत्रात भविष्य खूप उज्ज्वल आहे. आम्ही २०३६ मध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यास तयार आहोत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अमित शाह यांचे स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ते पुढे म्हणाले, देवभूमी केवळ राष्ट्रीय खेळांमुळेच नव्हे तर खेळांमधील खेळाडूंच्या कामगिरीमुळे आणि खेळांच्या यशस्वी आयोजनामुळे क्रीडाभूमी बनली आहे.’
अमित शाह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याव्यतिरिक्त समारोप समारंभाला उपस्थित राहिलेल्या इतर प्रमुख व्यक्तींमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, मेघालयचे मुख्यमंत्री संगमा, उत्तराखंडच्या क्रीडा मंत्री रेखा आर्य, बॉक्सर मेरी कोम आणि ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांचा समावेश होता.

क्रीडा मंत्री मांडवीय म्हणाले की, ‘उत्तराखंडने देशाला सांगितले आहे की ते केवळ देवभूमी नाही तर क्रीडाभूमी देखील आहे. खेळादरम्यान कोणत्याही खेळाडूला कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी राज्याने घेतली. भारत क्रीडा केंद्र बनण्याची ही सुरुवात आहे. या कार्यक्रमस्थळाची क्षमता २५ हजार आहे आणि समारंभासाठी ते तुडुंब भरलेले होते.’
मांडवीय पुढे म्हणाले, २०३६ पर्यंत भारत ऑलिंपिक खेळांमध्ये पहिल्या १० देशांमध्ये येण्याची ही सुरुवात आहे. देशात आता क्रीडा परिसंस्था आहे. ते खेळांसह प्रत्येक बाबतीत प्रगती करत आहे.’ यावेळी पी टी उषा म्हणाल्या की, हा प्रवास इथेच संपत नाही, ही भारतीय खेळांची फक्त सुरुवात आहे.
सर्व्हिसेस संघाने पटकावले अव्वल स्थान
२८ जानेवारी रोजी राष्ट्रीय खेळांना सुरुवात झाली. सर्व्हिसेस स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (एसएससीबी) संघाने गेल्या सहा राष्ट्रीय खेळांमध्ये एकूण १२१ पदकांसह (६८ सुवर्ण, २६ रौप्य, २७ कांस्य) पदकतालिकेत पाचव्यांदा अव्वल स्थान पटकावले. महाराष्ट्राने २०१ (५४ सुवर्ण, ७१ रौप्य, ७६ कांस्य) पदकांसह आर्मीपेक्षा जास्त पदके जिंकली परंतु कमी सुवर्णपदके जिंकल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हरियाणानेही १५३ पदकांसह आर्मीपेक्षा जास्त पदके (४८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५८ कांस्य) जिंकली, परंतु त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यजमान उत्तराखंडने २४ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४४ कांस्यपदकांसह एकूण १०३ पदकांसह सातवे स्थान पटकावले.