
लिजंड्स प्रीमियर लीग : डॉ मयूर जे सामनावीर, सतीश भुजंगेची वादळी फलंदाजी
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रोहन रॉयल्स संघाने न्यू एरा संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात डॉ मयूर जे याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. रोहन रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहन रॉयल्स संघाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत न्यू एरा संघाला २० षटकात सात बाद ११५ अशा माफक धावसंख्येवर रोखण्यात यश संपादन केले. त्यानंतर रोहन रॉयल्स संघाने केवळ १० षटकात दोन बाद ११६ धावा फटकावत आठ विकेट राखून मोठा विजय संपादन करत आगेकूच केली.

या सामन्यात सतीश भुजंगे याने अवघ्या २९ चेंडूत ६५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. सतीशने आपल्या आक्रमक खेळीत दोन उत्तुंग षटकार व १२ चौकार मारले. कर्णधार प्रदीप जगदाळे याने ३० चेंडूत ३१ धावांची वेगवान खेळी केली. प्रदीपने एक षटकार व तीन चौकार मारले. ओंकार सुर्वे याने २७ चेंडूत २९ धावांची आक्रमक खेळी केली. ओंकारने एक षटकार व तीन चौकार मारले.
गोलंदाजीत डॉ मयूर जे याने अवघ्या सात धावांत तीन विकेट घेत सामनावीर किताब संपादन केला. विनोद यादव याने १४ धावांत दोन गडी बाद केले. गुड्डू नेहरी याने १७ धावांत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक : न्यू एरा संघ : २० षटकात सात बाद ११५ (प्रदीप जगदाळे ३१, स्वप्नील खडसे १२, सुदर्शन एखंडे २४, रिझवान अहमद ७, ओंकार सुर्वे २९, मयूर जे ३-७, विनोद यादव २-१४, गुड्डू नेहरी १-१७, रोहन शाह १-३०) पराभूत विरुद्ध रोहन रॉयल्स संघ : १० षटकात दोन बाद ११६ (सतीश भुजंगे ६५, मिलिंद पाटील २१, मोहित घाणेकर नाबाद १०, सम्राट गुटे नाबाद ३, उत्सव बाहेती १-२१, नितीन कडवकर १-९). सामनावीर : डॉ मयूर जे