
१८० खेळाडूंचा सहभाग
पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा बुद्धीबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या १४ व्या प्रो वामनराव दत्तात्रय आलुरकर मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत १८० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूल या ठिकाणी रविवारी (१६ फेब्रुवारी) रंगणार आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, श्रीमती सुमती आलुरकर यांचे या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले असून स्पर्धेत एकूण २८ हजार ८०० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेप्रसंगी आयएम पद मिळवणाऱ्या कशिश जैन यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ही स्पर्धा अ) रेटेड १५५१ व त्यावरील खेळाडू, ब) रेटेड १५५० व त्याखालील खेळाडू, क) प्रौढ खेळाडू (६० वर्षांवरील) गटात होणार आहे.
स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये विरेश शरनार्थी (२१४६), गौरव बाकलीवाल (२११७), भुवन शितोळे (१५५०), प्रियल जैन (१५४८), अनिल राजे (१९५३), गिरीश जोशी (१७८२) हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. आयए विनिता क्षोत्री चीफ आर्बिटर, तर एफए श्रद्धा विचवेकर डेप्युटी चीफ आर्बिटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन आलुरकर यांचे चिरंजीव अविनाश आलुरकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. पहिल्या फेरीस ९.१५ वाजता प्रारंभ होणार आहे.