
मुंबई : इन्शुरन्स ओरिएंटल प्लेट शील्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत इंडिया फर्स्ट इन्शुरन्स आणि लार्सन अँड टुब्रो या संघांनी प्रभावी विजय मिळवत पहिल्या फेरीत आपली आगेकूच निश्चित केली. क्रॉस मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यांमध्ये इंडिया फर्स्ट इन्शुरन्सने बीएमसीचा २१ धावांनी, तर एल अँड टीने माझगाव डॉकचा ९ विकेट राखून पराभव केला.
पहिल्या सामन्यात इंडिया फर्स्ट इन्शुरन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १३९ धावा केल्या. सलामीवीर प्रेम मेहताने (५३ धावा) जबरदस्त अर्धशतक ठोकत संघाच्या डावाला आकार दिला. त्याला दत्ताराम हिंदळकर (१७), अंकित शास्त्री (११) आणि संकेत तेली (११) यांनी महत्त्वपूर्ण साथ दिली. बीएमसीकडून संतोष गाजरे (३-३०) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
बीएमसीला १४० धावांचे लक्ष्य पार करता आले नाही आणि त्यांचा डाव १८.४ षटकांत ११८ धावांवर आटोपला. जितेश पुरबियाने सर्वाधिक ३४ धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. इंडिया फर्स्टच्या संदीप शेट्टीने (४-३१) प्रभावी गोलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला.
एल अँड टी संघाचा सहज विजय
दुसऱ्या सामन्यात माझगाव डॉक संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १३९ धावा केल्या. फैजान वेल्डर (३९) आणि अमोल पांचाळ (२४) यांनी संघासाठी चांगले योगदान दिले. एल अँड टीच्या राहुल जोशी आणि जय शहाने प्रत्येकी दोन बळी घेत फलंदाजांवर अंकुश ठेवला.
प्रत्युत्तरात, एल अँड टी संघाच्या फलंदाजांनी सहज लक्ष्याचा पाठलाग करत केवळ १५.३ षटकांत १ बाद १४१ धावा करत शानदार विजय मिळवला. जयेश पाटील (नाबाद ५३), कुणाल साळवी (४०) आणि आकाश पालांडे (नाबाद ३७) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला आरामात विजय मिळवून दिला.