
नाशिकचा आकाश शिंदे कर्णधार
मुंबई : ओडिशा राज्यातील कटक येथे होणाऱ्या ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून नाशिकच्या आकाश शिंदेकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत जे एन बंदिस्त क्रीडा संकुलात ही प्रतिष्ठेची स्पर्धा रंगणार आहे.
गतवर्षी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या ७०व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारून तृतीय क्रमांक मिळवला होता. यंदा सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेऊन महाराष्ट्र संघ मैदानात उतरणार आहे. हा संघ १९ फेब्रुवारी रोजी कटकला रवाना होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्राचा विजयी निर्धार
महाराष्ट्र संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, प्रशिक्षक प्रताप शेट्टी व व्यवस्थापक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज आहे.
महाराष्ट्र संघ
कर्णधार आकाश शिंदे, आकाश रूडले, शंकर गदई, तेजस पाटील, संकेत सावंत, अक्षय सूर्यवंशी, मयूर कदम, शिवम पठारे, प्रणय राणे, अजित चौहान, कृषिकेश भोजने, संभाजी वाबळे.