
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा मोठा निर्णय
पुणे : अहिल्यानगर येथे झालेल्या ६७व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागात अंतिम कुस्ती झाली. या कुस्तीच्या निकालावरुन राज्यभर वादंग निर्माण झाले. या विषयावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संघटनेने चौकशी समिती नियुक्त केली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात गादी विभागात अंतिम कुस्ती झाली. या कुस्तीस मुख्य पंच म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबुलिया, मॅट चेअरमन म्हणून शासकीय प्रशिक्षक दत्तात्रय माने, साईड पंच म्हणून विवेक नाईकल यांची नेमणूक करण्यात आली होती. या कुस्तीच्या निकालावरुन बराच गदारोळ झाला. स्पर्धा संपल्यानंतरही लोकांमध्ये या निकालावरुन नाराजी व्यक्त होताना दिसली आहे.
या निकालाविरुद्ध शिवराज राक्षे यांनी आजपर्यंत कोणतीच लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली नाही. परंतु, समाजात सदर निकालाबाबत होत असलेल्या उलट सुलट चर्चेचा विचार करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने या बाबत पाच जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशी समितीच्या प्रमुखपदी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष विलास कथुरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या समितीत दिनेश गुंड (पुणे), सुनील देशमुख (जळगाव), नामदेव वडरे (सांगली), विशाल बलकवडे (नाशिक) यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
चौकशी समितीने कुस्तीच्या निर्णयाबाबत सखोल चौकशी करुन आपला अहवाल २८ फेब्रुवारीच्या अगोदर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास सादर करावा असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी एका पत्राद्वारे सांगितले आहे.