
काझी शमशुझामा सामनावीर, आदर्श यादवची नाबाद ९७ धावांची दमदार खेळी
जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर पुरुष निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत नांदेड संघाने नंदुरबार संघावर एक डाव आणि ६२ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात काझी शमशुझामा याने चमकदार कामगिरी नोंदवत सामनावीर किताब संपादन केला.

अनुभूती इंटरनॅशनल स्कूल मैदानावर नांदेड आणि नंदुरबार यांच्यात सामना झाला. नांदेड संघाने प्रथम फलंदाजी करत ६५ षटकात सर्वबाद ३१३ धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. त्यानंतर नंदुरबार संघाचा पहिला डाव ३७.४ षटकात १३१ धावांत गडगडला. त्यामुळे नांदेड संघाने नंदुरबार संघाला फॉलोऑन दिला. फॉलोऑनमध्ये खेळताना नंदुरबार संघाचा दुसरा डाव २९.४ षटकात १२० धावांत गारद झाला. नांदेड संघाने एक डाव आणि ६२ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात नांदेडच्या आदर्श यादव याने १४६ चेंडूत नाबाद ९७ धावांची दमदार खेळी केली. त्याने १६ चौकार मारले. उबेद खान याने ७० धावांची वेगवान खेळी केली. त्याने तीन उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. आमेर खान याने ४५ चेंडूत ६४ धावांची बहारदार खेळी साकारली. त्याने सात टोलेजंग षटकार व चार चौकार ठोकले.
गोलंदाजीत काझी शमशुझामा याने ६३ धावांत सात विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यश यादव याने चार विकेट घेतल्या तर अनिकेत इंद्रजीत याने तीन बळी घेतले.
या शानदार विजयाबद्दल नांदेड जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ माधव किन्हाळकर, सचिव अशोक तेरकर, मंगेश कामतीकर, निवड समिती प्रमुख रणजितसिंह चिरागिया, संघ व्यवस्थापक राजू चौधरी, मोईन यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
संक्षिप्त धावफलक : नांदेड : पहिला डाव : ६५ षटकात सर्वबाद ३१३ (अमर भांडवलकर १७, उबेद खान ७०, यश यादव १४, काझी शमशुझामा १६, आदर्श यादव नाबाद ९७, आमेर खान ६४, अनिकेत इंद्रजीत ३-८२, मोहनीश मुळे २-५३, समीर वसावे १-३१, कृष्णा मराठे १-४२, आदित्य वाघमारे १-२७, अक्षय चव्हाण १-१९).
नंदुरबार : पहिला डाव : ३७.४ षटकात सर्वबाद १३१ (प्रवीण तडवी ३३, हितेन पाटील ९, समीर वसावे १२, कृष्णा मराठे १३, अनिकेत इंद्रजीत १८, अक्षय चव्हाण नाबाद २५, यश यादव ४-०, आमेर खान २-३४, रुशी पुयाड २-३२, काझी शमशुझामा २-४४).
नंदुरबार : दुसरा डाव (फॉलोऑन) : २९.४ षटकात सर्वबाद १२० (धीरज मराठे १२, प्रवीण तडवी ८, हितेन पाटील १८, अक्षय चव्हाण २२, अनिकेत इंद्रजीत ३३, मोहनीश मुळे ८, काझी शमशुझामा ७-६३, यश यादव २-३१).