
मुंबई : बीसीसीआयच्या कडक धोरणाचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना झाला असून सर्व खेळाडू एकत्रित दुबईला रवाना झाले आहेत.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाला असून त्या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडू दिसत आहेत. यावरून असे दिसून येते की बीसीसीआयने जारी केलेल्या नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. बीसीसीआयने खेळाडूंसोबत प्रवास करण्याबाबत १० नवीन धोरणे नमूद केली होती. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, खेळाडू प्रशिक्षक आणि मुख्य निवड कर्त्यांना कळवून यातून सूट मिळवू शकतो, असेही त्यात म्हटले आहे. तथापि, संघ एकत्र निघून गेला आहे.
भारतीय क्रिकेट संघ आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. तर उर्वरित सामने पाकिस्तानात होणार आहेत. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि ९ मार्चपर्यंत चालेल. मुंबई विमानतळावर व्हिडिओमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीरसह वॉशिंग्टन सुंदर, उपकर्णधार शुभमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल, केएल राहुल, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर, फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ऋषभ पंत, कुलदीप यादव आणि काही इतर कर्मचारी दिसत होते. त्यानंतर रोहित शर्मा देखील गाडीतून बाहेर पडताना दिसतो. त्याच्यासोबत फील्डिंग कोच टी दिलीप हे होते.
२३ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने
गतविजेता पाकिस्तान १९ फेब्रुवारी रोजी कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेची सुरुवात करेल. पाकिस्तानचा शेवटचा लीग सामना २७ फेब्रुवारी रोजी रावळपिंडी येथे बांगलादेशविरुद्ध खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल. पाकिस्तान व्यतिरिक्त, भारताच्या गटातील इतर दोन संघ बांगलादेश आणि न्यूझीलंड आहेत. या मोठ्या सामन्यापूर्वी, भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशशी सामना करेल आणि पाकिस्तानशी सामना केल्यानंतर, संघ २ मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करेल. दुसऱ्या गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त, दोन्ही गटांचे सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील.
दोन्ही उपांत्य सामने ४ आणि ५ मार्च रोजी होतील. दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. ९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात राखीव दिवसाची तरतूद असेल. पहिला उपांत्य सामना (जर भारत पोहोचला तर) दुबईमध्ये खेळवला जाईल. जर भारत पात्र ठरला नाही तर सामना पाकिस्तानमध्येच होईल. त्याचप्रमाणे अंतिम सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. जर भारत विजेतेपदाच्या सामन्यात पोहोचला तर तो दुबईमध्ये होईल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. जागतिक क्रिकेट संघटनेने गेल्या वेळेच्या तुलनेत या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ५३ टक्क्यांनी वाढ केली आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाला २.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९.५ कोटी रुपये मिळतील.
उपविजेत्या संघाला ९.७२ कोटी रुपये मिळतील.
विजेत्या संघाव्यतिरिक्त, उपविजेत्या संघाला $१.१२ दशलक्ष (सुमारे ९.७२ कोटी रुपये) मिळतील, तर उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या दोन्ही संघांना $५६००० (४.८६ कोटी रुपये) मिळतील. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) झाली आहे. ‘मोठ्या प्रमाणात बक्षीस रक्कम ही खेळात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या स्पर्धांची जागतिक प्रतिष्ठा राखण्यासाठी आयसीसीची वचनबद्धता अधोरेखित करते,’ असे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
इतर संघांना किती पैसे मिळतील?
गट टप्प्यात जिंकणाऱ्या कोणत्याही संघाला $३४,००० (३० लाख रुपये) बक्षीस रक्कम मिळेल. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना $३५०,००० (सुमारे ३ कोटी रुपये) मिळतील, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना $१४०,००० (सुमारे १.२ कोटी रुपये) मिळतील. याशिवाय, या आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना $१२५००० (सुमारे १.०८ रुपये) कोटींची रक्कम दिली जाईल.