
डोपिंग प्रकरणात वाडाने केली कारवाई
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या जॅनिक सिनरवर ३ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणात सिनरवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकणाऱ्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या यानिक सिनरवर तीन महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या एका प्रकरणात शनिवारी जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (वाडा) आणि सिनर यांच्यात एकमत झाले. बंदी घातलेल्या औषधांच्या चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर बंदीतून सुटलेल्या सिनर विरुद्ध ‘वाडा’ने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील केले होते. या प्रकरणाची सुनावणी एप्रिल २०२५ मध्ये होणार होती. तथापि, वाडा आणि सिनर यांनी तीन महिन्यांच्या बंदीसाठी तोडगा काढल्याने हे घडले नाही. ही बंदी एप्रिलच्या मध्यापर्यंत लागू राहील.
या प्रकरणी वाडाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिनर ९ फेब्रुवारी ते ४ मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत अपात्रतेचा कालावधी पूर्ण करेल, त्यानंतर तो फ्रेंच ओपन स्पर्धेपूर्वी परतण्यास पात्र असेल. वाडाने पुढे सांगितले की, सिनर १३ एप्रिल २०२५ पासून अधिकृत प्रशिक्षण क्रियाकलापांमध्ये परत येऊ शकतो.