
वडोदरा : शेफाली वर्मा (४३), निकी प्रसाद (३५) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर दोन विकेट राखून रोमांचक विजय नोंदवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत मुंबईने निकराचे प्रयत्न केले. परंतु, अरुंधती रेड्डीने दोन धावा पळून काढत मुंबईच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.
दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य होते. कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने ५.५ षटकात ६० धावांची सलामी दिली. लॅनिंग तीन चौकारांसह १५ धावा काढून बाद झाली. शबनीम इस्माईलने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर अमेलिया केर हिने जेमिमा रॉड्रिग्जला २ धावांवर बाद करुन दुसरा धक्का दिला. शेफाली वर्मा हिनेआपल्या डावाची सुरुवात ६, ४, ४, ४, ४ अशी धमाकेदार केली. शेफालीने डावाच्या दुसऱ्या षटकात एकूण २२ धावा फटकावल्या. त्यामुळे धावगती कायम ठेवण्यात दिल्लीला यश आले. परंतु, शफाली १८ चेंडूत ४३ धावांवर तंबूत परतली. हेली मॅथ्यूजला आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात तिने आपली विकेट गमावली. तिने दोन षटकार व सात चौकार मारले. पाठोपाठ अॅनाबेल सदरलंड दोन चौकारांसह १३ धावांचे योगदान देऊन तंबूत परतली. १६ धावांच्या अंतरात दिल्ली संघाने तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या.

अनुभवी अॅलिस कॅप्सी (१६) व सारा ब्राइस (२१) यांनी फटकेबाजीच्या प्रयत्नात आपल्या विकेट गमावल्या. ठराविक अंतराने विकट पडत असताना अंडर १९ महिला विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार निकी प्रसाद हिने सुरेख फलंदाजी केली. शिखा पांडे २ धावांवर धावबाद झाली. त्यानंतर राधा यादव हिने उत्तुंग षटकार ठोकून संघाला विजयासमीप आणले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १० धावांची गरज होती. निकी हिने शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार मारत सामन्यातील रोमांच वाढवला. पहिला सामना खेळत असताना निकी प्रसाद हिने ३३ चेंडूत चार चौकारांसह ३५ धावांची शानदार खेळी केली. परंतु, विजयी षटकार मारण्याच्या प्रयत्नात निकी बाद झाली. तेव्हा दिल्लीला विजयासाठी एका चेंडूत २ धावांची गरज होती. अरुंधती रेड्डीने शेवटच्या चेंडूवर दोन धावा पळून काढत दिल्लीला रोमांचक विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्स संघाच्या हॅली मॅथ्यूज (२-३२), अमेलिया केर (२-२१) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुंबई इंडियन्स सर्वबाद १६४
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नॅट सिव्हर ब्रंट (नाबाद ८०) आणि हरमनप्रीत कौर (४२) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकांत १० गडी गमावून १६४ धावा केल्या.
या सामन्यात मुंबईची सुरुवात खास झाली नाही. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संघाला पहिला धक्का बसला. शिखा पांडेने हेली मॅथ्यूजला आपला बळी बनवले. ती खाते न उघडता पॅव्हेलियन मध्ये परतली. त्यानंतर शिखा हिने पाचव्या षटकात यास्तिका भाटियाला बाद केले. तिला फक्त ११ धावा करता आल्या. त्यानंतर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीतने जबाबदारी स्वीकारली. तिने तिसऱ्या विकेटसाठी नॅट सायव्हर ब्रंटसोबत ४० चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतने चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने संघाला १०० धावसंख्येच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरमनप्रीत हिने २२ चेंडूत ४२ धावांची धमाकेदार खेळी केली.
नॅट सिव्हर ब्रंट हिने अवघ्या ५९ चेंडूत नाबाद ८० धावांची वादळी खेळी केली. तिच्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईला १६४ धावसंख्या उभारता आली. दोन बाद १०४ अशा भक्कम स्थितीत एकवेळ मुंबई इंडियन्स संघ होता. परंतु, अवघ्या ६५ धावांत मुंबईने आठ विकेट गमावल्या.
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात मुंबईच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीकडून अॅनाबेल सदरलँडने तीन आणि शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या. दरम्यान, अॅलिस कॅप्सी आणि मिन्नू मनीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
रविवारचा सामना
गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्सवेळ : संध्याकाळी ७.३० वाजताथेट प्रक्षेपण : जिओ हॉटस्टार.