
लिजंड्स प्रीमियर लीग : इनायत अली सामनावीर, इंद्रजीत उढाण, दादासाहेब यांची शानदार कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राउडी सुपर किंग्ज संघाने डीएफसी श्रावणी संघावर नऊ गडी राखून दणदणीत विजय नोंदवत आगेकूच केली. या सामन्यात इनायत अली याने सामनावीर पुरस्कार संपादन केला. गुन्हे शाखेचे डीसीपी प्रशांत स्वामी यांच्या हस्ते त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डीसीपी स्वामी यांनी स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. राउडी सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरवत डीएफसी श्रावणी संघाला १८.४ षटकात अवघ्या ११७ धावांवर रोखण्यात यश मिळवले. त्यानंतर राउडी सुपर किंग्ज संघाने ११.४ षटकात एक बाद ११८ धावा फटकावत नऊ विकेट राखून मोठ्या फरकाने सामना जिंकला.
या सामन्यात इंद्रजीत उढाण, इनायत अली, दादासाहेब यांनी धमाकेदार फलंदाजी करत मैदान दणाणून सोडले. इंद्रजीत उढाण याने ३४ चेंडूंचा सामना करत नाबाद ५४ धावांची बहारदार खेळी केली. त्याने दोन षटकार व पाच चौकार मारले. इनायत अली याने ३२ चेंडूत ५३ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने तीन षटकार व पाच चौकार मारले. दादासाहेब याने ३२ चेंडूत ४९ धावा फटकावल्या. त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. दादासाहेब याने नऊ चौकार मारले.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात इनायत अली याने केवळ १४ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. इंद्रजीत उढाण याने २१ धावांत दोन गडी बाद केले. विराज चितळे याने १५ धावांत एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : डीएफसी श्रावणी संघ : १८.४ षटकात सर्वबाद ११७ (दादासाहेब ४९, अमान शेख २०, इशांत राय ८, गणेश ठाकूर ७, इतर २३, इनायत अली ५-१४, इंद्रजीत उढाण २-२१, विराज चितळे १-१५, परिक्षित मुत्रक १-१४, निनाद खोचे १-८) पराभूत विरुद्ध राउडी सुपर किंग्ज संघ : ११.४ षटकात एक बाद ११८ (इंद्रजीत उढाण नाबाद ५४, इनायत अली ५३, स्वामी सर नाबाद ७, गणेश ठाकूर १-११). सामनावीर : इनायत अली.