
राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा गौरव
छत्रपती संभाजीनगर : ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या गटात दिल्ली तर मुलींच्या गटात छत्तीसगड या संघांनी उपविजेतेपद मिळवले.
भारतीय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना आणि छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहाय्याने ६८व्या राष्ट्रीय १४ वर्षांखालील मुला-मुलींची सॉफ्टबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आली. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत दोन्ही गटात खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत स्पर्धा गाजवली.
या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात दिल्ली संघाचा २-१ होमरनने पराभव करुन विजेतेपद पटकावले. दिल्ली संघ उपविजेता ठरला. चंदीगड संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. राजस्थान संघाने चौथा क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने अजिंक्यपद मिळवले. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघाचा २-१ होमरनने पराभव केला. त्यामुळे छत्तीसगड संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. राजस्थान संघाने तिसरा क्रमांक मिळवला. दिल्ली संघाने चौथे स्थान संपादन केले.

पारितोषिक वितरण सोहळा
इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अतुल सावे यांनी विजयी संघांना चषक व पदके देऊन सन्मानित केले. तसेच नियमाप्रमाणे पहिल्या तीन विजयी संघांना चषक व पदक देऊन सन्मानित करण्यात येते. परंतु, क्रीडा कार्यालयातर्फे चतुर्थ येणाऱ्या संघास सुद्धा विशेष प्रोत्साहनात्मक चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्व राज्यातून आलेल्या पंचाना विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे स्पर्धा निरीक्षक अनिल मिश्रा, संजय बाबर, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, संजीवनी शिक्षण संस्थेचे संस्थापक अमित कोल्हे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी, क्रीडा अधिकारी खंडूराव यादव, क्रीडा अधिकारी राम मायंदे, क्रीडा अधिकारी लता लोंढे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे, वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव दीपक रुईकर, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, मृत्युंजय शर्मा, विजय गौड, राकेश खैरनार, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, स्पर्धा पंच प्रमुख गणेश बेटूदे, सागर रूपवते, सुनील सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतुल सावे यांनी सॉफ्टबॉल खेळातील राज्य, राष्ट्रीय, विद्यापीठ पातळीवर चमकणाऱ्या तसेच आंतरराष्ट्रीय आशियाई, विद्यापीठ आशियाई खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन गौरवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी मंत्री अतुल सावे यांना स्पर्धेची संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव गोकुळ तांदळे यांनी केले. क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांनी आभार मानले.
अंतिम सामन्यात धनंजय गोंडगे, कार्तिक,शंतनू, अस्मि राऊत, तनया पवार (महाराष्ट्र), त्रिवेणी अनुराधा, सिमरन (छत्तीसगड), राधिका, आदिती, नव्या, अब्दुल सुभान, कार्तिक, अभय (दिल्ली), प्रिन्स, अनिल, मोहित (चंदीगड) या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या सामन्यांसाठी पंच प्रमुख अक्षय येवले, स्वप्नील चांदेकर, विकास वानखेडे, संतोष आवचार, रोहित तुपारे, भीमा मोरे, प्रीतीश पाटील, प्रवीण गडख आदींनी पंच म्हणून काम पाहिले. गुणलेखक म्हणून ईश्वरी शिंदे, ईश्वरी चव्हाण, दीक्षा शिनगारे यांनी भूमिका निभावली.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रबोधिनी प्राचार्य पूनम नवगिरे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन पुरी, रफीक जमादार, पांडुरंग कदम, किशोर चव्हाण, अनिल दांडगे, गणपत पवार, श्यामसुंदर भालेराव, रमेश कवडे, गौरव साळवे, निखिल वाघमारे, श्रवण शिटे, विशाल जहारवाल, दीपक भवर, कार्तिक तांबे यांच्यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.
कोट

राज्यात खेळाडूंना विशेष सवलतीच्या सहाय्याने नोकरी देऊन अधिकारी बनवण्याची संधी देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य देशात खेळाडूंना अधिकारी बनवणारे पहिले राज्य ठरत आहे. खेळाडूंनी मोबाईलपेक्षा मैदानावर आपले लक्ष्य केंद्रीत केले तर त्यांना करिअरची मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल.
- अतुल सावे, कॅबिनेट मंत्री.
…..
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आयोजकांनी केले. आयोजकांना उपलब्ध असलेल्या निधीमधून त्यांनी पुरवलेल्या सुविधा खूप चांगल्या होत्या. निधीच्या तुलनेत स्पर्धेचे आयोजन अधिक चांगले झाले. आयोजकांचे अभिनंदन.
- अनिल मिश्रा, स्पर्धा निरीक्षक, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया.
