
कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी १८व्या इंडियन प्रीमियर लीग हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या स्पर्धेचा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होईल. अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.

२३ मार्च रोजी आयपीएलचा एल क्लासिको म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना खेळला जाईल. ६५ दिवसांत १३ ठिकाणी १० संघांमध्ये एकूण ७४ सामने खेळवले जातील. यामध्ये नॉकआउट फेऱ्यांचा समावेश आहे. या काळात २२ मार्च ते १८ मे या कालावधीत ७० लीग फेरीचे सामने खेळवले जातील. त्याच वेळी, अंतिम सामन्यासह सर्व प्लेऑफ सामने २० ते २५ मे दरम्यान खेळवले जातील.

एकूण १२ डबल हेडर खेळले जाणार
२२ मार्च रोजी बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर, डबल हेडर सामना रविवार, २३ मार्च रोजी खेळला जाईल. रविवारी, पहिल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई संघ चेन्नईशी सामना करेल. आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी ३.३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल.
तीन संघांकडे प्रत्येकी दोन होम ग्राउंड
आयपीएलच्या दहा संघांपैकी तीन संघ प्रत्येकी दोन घरच्या मैदानावर सामने खेळतील. दिल्ली आपले होम सामने विशाखापट्टणम आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. राजस्थान त्यांचे दोन घरचे सामने गुवाहाटीमध्ये खेळेल, जिथे ते केकेआर आणि सीएसकेचे आयोजन करतील. याशिवाय, उर्वरित घरचे सामने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम मध्ये खेळवले जातील. पंजाब आपले चार घरच्या मैदानावर चंदीगड मधील नवीन पीसीए स्टेडियमवर खेळेल, तर धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर लखनऊ, दिल्ली आणि मुंबईविरुद्ध तीन घरच्या मैदानावर सामने होतील.
हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील प्लेऑफ सामना
लीग स्टेज पूर्ण झाल्यानंतर, प्लेऑफ सामने हैदराबाद आणि कोलकाता येथे खेळवले जातील. हैदराबाद २० मे २०२५ आणि २१ मे रोजी क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचे आयोजन करेल. त्यानंतर कोलकाता २३ मे २०२५ रोजी क्वालिफायर २ आणि २५ मे रोजी अंतिम सामना आयोजित करेल.
केकेआर गत आयपीएलचा विजेता
आयपीएलचा शेवटचा हंगाम खूप रोमांचक होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने चेन्नईतील चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला आठ विकेटने पराभूत करून विजेतेपद जिंकले. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता संघाचे हे तिसरे विजेतेपद होते.