
यूपी वॉरियर्स संघ सहा विकेटने पराभूत
वडोदरा : अॅशले गार्डनर (५२), हरलीन देओल (नाबाद ३४) आणि डिआँड्रा डॉटिन (नाबाद ३३) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर गुजरात जायंट्स संघाने यूपी वॉरियर्स संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवला. धावांचा पाठलाग करताना पहिल्यांदाच गुजरात संघाने बाजी मारली आहे.
विजयासाठी १४४ धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. बेथ मुनी (०) व दयालन हेमलता (०) या धावांचे खाते न उघडताच बाद झाल्या. त्यावेळी संघाची स्थिती दोन बाद २ अशी बिकट झाली होती. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड्ट व अॅशले गार्डनर या जोडीने आक्रमक फलंदाजी करत ५५ धावांची भागीदारी केली. लॉरा २२ धावांवर बाद झाली. तिने एक षटकार व दोन चौकार मारले. अॅशले गार्डनर हिने अवघ्या ३२ चेंडूच ५२ धावांची दमदार खेळी करत सामन्यातील रंगत कायम ठेवली. तिने तीन उत्तुंग षटकार व पाच खणखणीत चौकार मारले. मॅकग्रा हिने गार्डनर हिला बाद करुन मोठा अडथळा दूर केला.
हरलीन देओल आणि डिआंड्रा डॉटिन या जोडीने परिस्थितीनुसार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देणारी ५८ धावांची भागीदारी केली. हरलीन हिने ३० चेंडूत नाबाद ३४ धावा फटकावल्या. तिने चार चौकार मारले. डॉटिन हिने केवळ १८ चेंडूंचा सामना करत नाबाद ३३ धावांची तुफानी खेळी साकारली. तिने दोन षटकार व तीन चौकार मारले. १८व्या षटकात गुजरात संघाने चार बाद १४४ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. सोफी एक्लेस्टोन हिने १६ धावांत दोन बळी घेतले.
यूपी वॉरियर्स नऊ बाद १४३ धावा
गुजरात संघाची कर्णधार अॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु दीप्ती शर्माच्या संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. यूपी संघाने २० षटकांत नऊ विकेट गमावून १४३ धावा केल्या.
पहिलाच सामना खेळणाऱ्या यूपी वॉरियर्सची सुरुवात खास झाली नाही. संघाने २२ धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. डिआंड्रा डॉटिनने किरण नवगिरची विकेट घेतली. तिला फक्त १५ धावा करता आल्या. यानंतर अॅशले गार्डनरने दिनेश वृंदाला बाद केले. ती फक्त सहा धावा करून परतली. यानंतर, उमा छेत्री आणि दीप्ती शर्मा यांनी आघाडीची सूत्रे हाती घेतली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ५१ धावांची भागीदारी झाली. डॉटिन हिने ही भागीदारी मोडली. तिने यष्टीरक्षक फलंदाज उमाला प्रिया मिश्राकरवी झेलबाद केले. चार चौकारांच्या मदतीने २४ धावा काढून ती बाद झाली.
या सामन्यात प्रिया मिश्राने अप्रतिम गोलंदाजी केली. प्रिया हिने एकूण तीन विकेट्स घेतल्या. तिने डावाच्या ११ व्या षटकात दोन विकेट घेऊन यूपी संघाला अडचणीत आणले. त्यानंतर लेग-स्पिनर प्रिया हिने कर्णधार दीप्तीला बाद करुन मोठा अडसर दूर केला. तिचा झेल अॅशले गार्डनर हिने घेतला. २७ वर्षीय दीप्ती हिने २७ चेंडूत ३९ धावा केल्या. ग्रेस हॅरिसने चार, श्वेता सेहरावतने १६, सोफी एक्लेस्टोनने दोन आणि साईमा ठाकोरने १५ धावा केल्या.
गुजरातकडून डिआंड्रा डॉटिन आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. काशवी गौतमला एक विकेट मिळाली.