जीजीआयएमचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

  • By admin
  • February 17, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

पुणे : गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (जीजीआयएम) ने आपल्या दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा भव्य सोहळा मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात साजरा केला. या ऐतिहासिक प्रसंगी मान्यवर व्यक्ती, साहसप्रेमी आणि गिर्यारोहण क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले होते.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून पुण्याचे खासदार व नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मान्यवर अतिथी म्हणून मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोहळ्यात उपस्थिती लावली. तसेच, या कार्यक्रमास प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त ब्रिगेडियर अशोक अ‍ॅबे, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य कर्नल अंशुमान भदौरिया, जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य कर्नल हेमचंद्र सिंग, विंग कमांडर देवीदत्ता पंडा, उद्योगपती जगदीश कदम, जीजीआयएमचे संस्थापक संचालक उमेश झिरपे,क्युबिक्स मायक्रो सिस्टिम्सचे संचालक व जीजीआयएमचे संचालक विजय जोशी, गार्डियन कॉर्पोरेशनचे संचालक मनीष साबडे, निवृत्त कर्नल गिरीजाशंकर मुंगली (संस्कृती स्कूल, पुणे), गिरिप्रेमीचे संस्थापक विश्वस्त आनंद पाळंदे व उषःप्रभापागे, गिरिप्रेमीचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, पीक प्रमोशन्स (नेपाळ) प्रमुख केशब पौडियाल, तसेच मनालीतील प्रसिद्ध गिर्यारोहक आणि उद्योजक खेमराज ठाकूर, चंदन शर्माव जीजीआयएमचे सर्व संचालक उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात जीजीआयएमच्या दहा वर्षांच्या प्रवासावर आधारित माहितीपटाने झाली. संस्थेच्या गिर्यारोहण व साहसी शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाचा आढावा घेत हा माहितीपट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला. या सोहळ्यात जीजीआयएमच्या पहिल्या अधिकृत माउंटेनिअरिंग हँडबुक चे प्रकाशन करण्यात आले, जे भविष्यातील गिर्यारोहकांसाठी मार्गदर्शक ठरेल.


यावेळी जीजीआयएमने आपल्या अव्हान निर्माण उडान (एएनयू), डिप्लोमा इन माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स आणि इतर प्रशिक्षणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. या प्रशिक्षणांमधून विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी गिर्यारोहण क्षेत्रात आपली आवड जोपासली आहे.

पुणेकरांसाठी अभिमानास्पद : मोहोळ 

यावेळी प्रमुख पाहुणे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘पुण्यात अशा दर्जेदार संस्थेची स्थापना होऊन ती जागतिक स्तरावर नावारूपास येत आहे, हे सर्व पुणेकरांसाठी अभिमानास्पद आहे. खासदार म्हणून मी जीजीआयएमला पूर्ण पाठिंबा देतो. पुणे आता साहसी क्रीडांचे राजधानी झाले आहे. २० एव्हरेस्टवीर पुण्यात आहेत, त्यापैकी १४ गिरिप्रेमी व जीजीआयएमशी संबंधित आहेत. मी या प्रवासाचा भाग असण्याचा अभिमान बाळगतो आणि जीजीआयएमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’

गिर्यारोहणासाठी अदम्य इच्छाशक्ती लागते : फणसळकर

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी जीजीआयएमच्या कणखरतेचे कौतुक करताना सांगितले की, ‘अशी संस्था उभारण्यासाठी केवळ गिर्यारोहण कौशल्य नव्हे, तर अदम्य इच्छाशक्ती लागते. जीजीआयएमच्या चमूने गिर्यारोहणातील धैर्य आणि चिकाटी केवळ हिमालयात नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातही सिद्ध केली आहे. मी त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’

निवृत्त ब्रिगेडियर अशोक अ‍ॅबी यांनी जीजीआयएमच्या योगदानावर प्रकाश टाकत, ‘जीजीआयएमने भारतात साहसी संस्कृती रुजविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. भविष्यात संस्थेने हिमालयात नवीन गिर्यारोहण मार्ग शोधावेत आणि आधुनिक चढाई शैली अंगीकाराव्यात,’ असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात गिर्यारोहण व साहसी शिक्षणाविषयी मान्यवरांशी परिसंवादही झाला. यात कर्नल अंशुमान भदौरिया, कर्नल हेमचंद्र सिंग, विंग कमांडर देविदत्ता पांडा, आणि केशब पौडियाल यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन भूषण हर्षे व उषाप्रभा पागे यांनी केले.

कर्नल अंशुमान भदौरिया यांनी साहसी शिक्षणामुळे मन शांत आणि संतुलित राहते, असे मत मांडले. विंग कमांडर देविदत्ता पांडा यांनी युद्धउड्डाण व गिर्यारोहण यामधील मानसिक आणि शारीरिक आव्हानांबाबत सांगितले. कर्नल हेमचंद्र सिंग यांनी गिर्यारोहणाच्या आध्यात्मिक बाजूवर प्रकाश टाकला.

या सोहळ्यात जीजीआयएम आणि गिरिप्रेमी अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशनच्या प्रशिक्षक व मार्गदर्शक यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ८० हून अधिक फ्रीलान्स प्रशिक्षकांचा सहभाग होता. प्रमुख एव्हरेस्टवीर आशिष माने, जितेंद्र गवारे, कृष्ण ढोकेले, प्रसाद जोशी, आणि आनंद माळी यांच्यासह अनेक गिर्यारोहक उपस्थित होते.

डॉ अमित त्रिभुवन यांनी सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन केले, तर भूषण हर्षे यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

जीजीआयएमचा दहाव्या वर्धापन दिनाचा हा सोहळा संस्थेच्या गिर्यारोहण आणि साहसी शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. भविष्यात संस्थेच्या कार्याचा विस्तार करून नव्या साहसी संधी निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *