
आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी आरोग्य विद्यापीठाचा संघ रवाना
नाशिक : ‘खेळांमुळे आत्मविश्वास, सांघिक भावना वाढते असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी केले.
या वर्षीचा आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे संपन्न होणार आहे. याकरिता सहभागी होणाऱ्या खेळांडूच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सराव शिबिराचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत लेफ्टनंट जनरल डॉ राजीव कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, उपकुलसचिव डॉ सुनिल फुगारे, उपकुलसचिव एन व्ही कळसकर, विधी अधिकारी अॅड संदीप कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे, सहाय्यक कुलसचिव संदीप राठोड, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब पेंढारकर आदी
मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, ‘व्यक्तिमत्व विकासात विविध प्रकाराच्या खेळांचा महत्वपूर्ण सहभाग असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात एकतरी खेळामध्ये सातत्यपूर्ण सराव ठेवावा त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहते तसेच खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. निर्णय क्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. जेणेकरुन विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करुन संपूर्ण विद्यापीठ परिसरामध्ये फेरी काढली. तसेच कुलगुरू यांना मानवंदना देऊन क्रीडा महोत्सवाकरीता प्रस्थान केले. या प्रसंगी कुलगुरूंनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव सराव शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता विद्यापीठातील समाधान जाधव, अविनाश सोनवणे, सुरेश पुजारी, अर्जुन नागलोत, मानसी हिरे, घनश्याम धनगर, राजेंद्र दिवे, वासंती चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.