
सी के नायडू ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघाने सी के नायडू ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य सामन्यात महाराष्ट्र संघाचा सामना मुंबई संघाशी होणार आहे. महाराष्ट्र-मुंबई सामना १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत हर्षल काटे याने शानदार फलंदाजी केली आहे. हर्षलने पाच सामन्यांत तीन शतके या स्पर्धेत ठोकली आहेत. सात डावात हर्षलने ६४६ धावा फटकावल्या आहेत. एक अर्धशतकही हर्षलने झळकावले आहे. शुभम मैड याने ८ सामन्यात २६ विकेट घेऊन सर्वांचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५२ धावांत चार विकेट अशी राहिली आहे. विकी ओस्तवाल याने ८ सामन्यांत ९ डावांत २९५ धावा फटकावल्या आहेत. त्यात नाबाद १०८ धावांची महत्त्वपूर्ण खेळीचा समावेश आहे. विकी याने दोन अर्धशतके देखील काढली आहेत.
महाराष्ट्र संघाने राजस्थान संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर बाजी मारुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुंबई संघाविरुद्ध महाराष्ट्र संघाकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.