नागपूर राज्य बॉक्सिंग स्पर्धा आयोजनावरुन गदारोळ

  • By admin
  • February 17, 2025
  • 0
  • 44 Views
Spread the love

अविनाश बागवे यांची दीपक मेजारी यांच्याकडे खेळाडूंना न्याय देण्याची मागणी

पुणे : नागपूर येथे वरिष्ठ महिला गटाची राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत अनेक खेळाडू अधिकृत संघटनेच्या निवड चाचणीत सहभागी न होता थेट सहभागी झाले आहेत. या संदर्भात आपण तातडीने लक्ष घालून संघटनेच्या खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अॅडहॉक कमिटीचे चेअरमन दीपक मेजारी यांच्याकडे केली आहे.

पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, ‘आपल्या मान्यतेने नागपूर येथे वरिष्ठ महिला गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. या संदर्भातच काही अती महत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक वाटते.’

१. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे संलग्न अधिकृत जिल्हा व शहर संघटनेच्या खेळाडूंच्या व्यतिरिक्त काही खेळाडू अधिकृत संघटनेच्या निवड चाचणीमध्ये सहभागी न होता थेट आले आहेत व अशा खेळाडूंना आपण संधी देण्याने निवड चाचणीमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर अन्याय आहे. यामुळे जिल्हा व शहर संघटनेच्या निवड चाचणीला काहीच अर्थ राहत नाही.

२. या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून अधिकृत जिल्हा/शहर संघटनेचे राष्ट्रीय किंवा निदान महाराष्ट्र ३ स्टार पंच आवश्यक आहेत. परंतु, एकही राष्ट्रीय पंच या स्पर्धेमध्ये नाही व जे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पंच स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक होते, त्यांना न घेता केवळ ठराविक जवळच्या जिल्ह्यांचे व कमी पात्रतेचे पंच या स्पर्धेमध्ये आहेत, इतकेच नव्हे तर ज्या पंचांना आम्ही संघटना विरोधी कारवाया केल्याबद्दल निलंबित केले आहे, त्यापैकी एका पंचास आपण या स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम करू देत असल्याचे आम्हाला निदर्शनास आले आहे, व यामुळे आमच्या कार्यरत पंचांवर व आमच्या संघटनेच्या हक्कांवर गदा येत आहे.

३. पुणे शहर संघाची निवड चाचणी पुणे शहरात ११ फेब्रुवारी रोजी झाल्यावर संघ नागपूर येथे खेळावयास गेला. तेथे गेल्यावर खेळाडूंना पिसोळी पुणे संघातील खेळाडूंबरोबर ट्रायल द्यावी लागेल असे आयोजक आणि स्पर्धांची जबाबदारी असणाऱ्या मनोज पिंगळे यांनी सांगितले. त्याला खेळाडू आणि पुणे शहर संघटनेने विरोध करून आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर सदर स्पर्धा दिवसभर थांबवली होती. नंतर पिसोळी पुणे या नावाने अनधिकृत संघास प्रवेश देऊन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. बॉक्सिंगच्या नियमानुसार एका दिवशी फक्त एकच बाऊट होणे अपेक्षित असताना काही खेळाडूंना दोन बाऊट खेळायला लागल्या आहेत.

४. स्पर्धा अधिकृत आहे याचे प्रमाणपत्र ५ टक्के गुणांसाठी पात्र होणार आहे. तसेच नोकरीसाठी पात्र होणार असे तेथे उपस्थित असणाऱ्या खेळाडू आणि संघ प्रशिक्षक व्यवस्थापक यांना सांगितले जात आहे. परंतु, राज्य संघटनेस संलग्न असणारेच युनिट यात सहभागी असावेत असा शासन नियम असताना अनधिकृत संघ पिसोळी पुणे नावाने सहभागी करून घेतल्याने स्पर्धेच्या अधिकृततेवरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.

५. राज्य संघटनेकडे अनेक अधिकृत पंच असताना आणि अनेकांनी स्पर्धेस येण्याबाबत उत्सुकता दाखवून सुद्धा त्यांना का स्पर्धेत सहभागी करून घेतलेले नाही यामुळे सुद्धा आयोजकांच्या हेतू बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

६. इतर जिल्हा संघटनांनी स्पर्धा घेण्याची आयोजित करण्याचे कळवून सुद्धा त्यांचा विचार न करता स्पर्धा नागपूरलाच का देण्यात आली हे सुद्धा कळू शकत नाही.

७. स्पर्धेत केवळ संलग्न जिल्हा संघटनेचे पंच सहभाग असावेत आणि ते सर्व ८ विभागातील असावेत असा नियम असताना अनधिकृत संघटनेचे अजित ओसवाल हे कसे सहभागी झाले आहेत त्यांना तांत्रिक अधिकारी म्हणून कसे सहभागी करून घेतले ?

८. सदर स्पर्धेत सर्व आठ विभागातील पंच सहभागी नाहीत त्यामुळे स्पर्धेच्या निर्णयावर शंका उपस्थित होत आहे.

अशा विविध मुद्यांचे निवेदन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे, कार्याध्यक्ष मदन वाणी, सचिव विजय गुजर यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *