
नागपूर (सतीश भालेराव) : २१व्या ज्युनियर आणि सीनियर राष्ट्रीय जंप रोप चॅम्पियनशिप स्पर्धेत हुडकेश्वर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या जंप रोप असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेतर्फे राष्ट्रीय ज्युनियर व सीनियर जंप रोप चॅम्पियनशिप घेण्यात आली. या स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी नोंदवली.
डबल टच जंप रोप स्पर्धेत स्वरा वैद्य, कनिष्का धोटे आणि रुपिका बेलसरे यांनी १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच ओजस नारनवरे, शौर्य उमाते आणि हर्ष सावरबांधे यांनी १४ वर्षांखालील मुलांच्या गटात रौप्य पदकाची कमाई केली.
३० सेकंदाच्या जंप रोप स्पर्धेत आर्श दोडके याने सुवर्णपदक जिंकले. रिले जंप रोप स्पर्धेत देखील स्कॉलर्स स्कूल संघाने शानदार कामगिरी नोंदवली. १९ वर्षांखालील गटात कनिष्का धोटे, स्वरा वैद्य, रुपिका बेलसरे यांनी सुवर्णपदक जिंकले. डबल पेअर जंप रोप स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात संस्कार सुनवणे आणि सात्विक धुर्वे यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका आरती चौबे यांनी खेळाडू व मार्गदर्शक सारंग उमाटे आणि क्रीडा विभागाचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धांमध्ये शाळेच्या कामगिरीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले.