
दक्षिण कोरियाचे वर्ल्ड सोसायटीचे अध्यक्ष जोग यंग यांच्या हस्ते रोकडे यांचा सन्मान
छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद येथे एका शानदार सोहळ्यात मोरेश्वर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे यांना इंटरनॅशनल इमिनन्स अवार्ड इन फिजिकल एज्युकेशन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दक्षिण कोरियाचे वर्ल्ड सोसायटी ऑफ पीसचे अध्यक्ष डॉ जोग यंग यांच्या हस्ते डॉ रोकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ रोकडे यांनी पत्नी नूतन रोकडे यांच्यासह हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

क्रीडा क्षेत्रासह, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून देशहितासाठी झटणाऱ्या व लोकसेवेसाठी समर्पित असणाऱ्या देशातील कला-गुण संपन्न प्रतिभावंत व गुणवंत व्यक्तींना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन, फिटनेस अँड स्पोर्ट्स सायन्स असोसिएशनच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हैदराबाद येथील वासवी इंजीनियरिंग महाविद्यालय येथे आयोजित इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन फिटनेस अँड स्पोर्ट्स सायन्स असोसिएशन व हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेत दक्षिण कोरियातील वर्ड सोसायटी ऑफ पीसचे अध्यक्ष डॉ ली जोग यंग व बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशनचे सरचिटणीस सन्माननीय दीपक शेटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या परिषदेत सुमारे ३५० भारतीय प्रतिनिधी आणि इतर देशांतील ३० प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. क्रीडा विज्ञानातील क्षेत्रातील साक्षरता विकासाबरोबरच शारीरिक शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, क्रीडा शास्त्रज्ञ, प्रशिक्षक, डॉक्टर आणि इतर सहभागींना या परिषदेत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन फिटनेस अँड स्पोर्ट्स सायन्स असोसिएशनच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ क्रीडा क्षेत्रातील संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचे प्राथमिक उद्दिष्ट क्रीडा शिक्षण, तंदुरुस्ती, आरोग्य आणि जीवनमानाचा दर्जा वाढवणे आणि प्रोत्साहन देणे हे असून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी खेळांच्या उपयुक्ततेबद्दल माहितीची देवाणघेवाण या परिषदेत केली जाते. वैयक्तिक तंदुरुस्ती, एकता आणि लिंग समानता वाढविण्यासाठी खेळाचा जागतिक स्तरावर एक व्यासपीठ म्हणून असोसिएशनच्या वतीने उपयोग केला जात आहे. त्यात खेळाबरोबरच क्रीडा मानसशास्त्र, तंत्रज्ञान, शारीरिक व्यायाम, पोषण आणि आरोग्य यांसह विविध विषयांचा समावेश आहे.
प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे यांना त्यांच्याआंतरराष्ट्रीय स्तरावरील शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिजिकल एज्युकेशन फिटनेस अँड स्पोर्ट्स सायन्स असोसिएशन यांच्यावतीन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी तेलंगणा राज्याचे दारूबंदी आणि उत्पादन शुल्क पर्यटन आणि संस्कृती आणि पुरातत्व मंत्री श्री जुपल्ली कृष्णा राव,दक्षिण कोरियातील वर्ल्ड सोसायटी ऑफ पीसचे अध्यक्ष डॉ ली जोंग-यंग; बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशनचे सरचिटणीस दीपक शेटे, मम्माबी, वासावी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ एस व्ही रमणा, प्रोफेसर. जे प्रभाकर राव, प्रोफेसर राजेश कुमार, प्रोफेसर एल बी लक्ष्मीकांत राठोड, प्रोफेसर बी सुनील कुमार, डॉ वाय इमॅन्युएल, प्रोफेसर के दीपला आणि जी व्ही आदित्य यांच्यासह जगभरातील विविध देशातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत उपस्थित होते.
‘सातत्यपूर्ण संघर्ष व समर्पणाचे फलित म्हणजे आजचा हा पुरस्कार असल्याचे’ गौरवोद्गार या प्रसंगी प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे यांनी काढले. डॉ रोकडे यांच्यातील अनन्यसाधारण राष्ट्रीय कर्तव्य भाव वृत्तीचा व गुणवत्तेचा गौरव म्हणून हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ राजेश कुमार व शारीरिक शिक्षण विषयाचे माजी कुलगुरू तथा प्रोफेसर डॉ लक्ष्मीकांत राठोड, प्राचार्य डॉ घन:श्याम ढोकराट व क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत अनेक मान्यवरांनी प्रोफेसर डॉ पंढरीनाथ रोकडे यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ पंढरीनाथ रोकडे हे मोरेश्वर महाविद्यालयात गेल्या ३० वर्षांपासून शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख कार्यरत असून शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयात त्यांनी अतुलनीय कार्य केलेले आहे. त्यांची संशोधनामध्ये रुची असून त्यांच्या मार्गदर्शनात आजपर्यंत २१ विद्यार्थ्यांनी पीएच डी पूर्ण केली आहे. तसेच १७ विद्यार्थी एम फील उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयात १७ पुस्तके प्रकाशित असून शंभरहून अधिक राज्य, राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. ५० पेक्षा अधिक त्यांचे संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर झालेले असून त्यांनी मलेशिया बँकॉक, कझाकिस्तान, रशिया देशांमध्ये अभ्यासदौरे केलेले आहेत. त्यांचा एपीआय स्कोर १२८२ असून छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध क्रीडा संघटनांमध्ये ते संघटक म्हणून कार्यरत आहेत. आजतागायत त्यांना विविध राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २० पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. नुकतेच शारीरिक शिक्षण विषयात त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भौतिक-शिक्षण प्रशिक्षण उपकरण या संशोधनास भारत सरकार मार्फत पेटंट दर्जा प्राप्त झाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह महाराष्ट्र राज्याच्या इतर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर त्यांनी काम केले असून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक महासंघाचे महासचिव म्हणून त्यांनी भरीव काम केलेले आहे.
डॉ पंढरीनाथ रोकडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर विजय फुलारे, प्र-कुलगुरु प्रोफेसर डॉ वाल्मीक सरोदे, कुलसचिव प्रोफेसर डॉ प्रशांत अमृतकर, विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप यांच्यासह क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.