
श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने शताब्दी चषक विभागीय खो-खो स्पर्धेचे आयोजन
ठाणे : अंतिम सामन्यात उत्कंठेचा कळस गाठत विहंग क्रीडा मंडळाने जादा डावात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीवर २६-२३ अशी मात करत श्री हनुमान व्यायामशाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शताब्दी चषक जिल्हास्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटातील थरारक सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीला पराभव स्वीकारावा लागला. महिला गटात त्यांनी शिवभक्त क्रीडा मंडळाचा ७-६ असा पराभव करत अंतिम विजेतेपदावर मोहोर उमटवली.
अंतिम लढतीत विहंग संघाने पहिल्या डावात आक्रमक खेळ करत १०-८ अशी आघाडी मिळवली. मात्र, शिर्सेकर्स संघाने जोरदार प्रत्युत्तर देत दुसऱ्या डावात सामना १८-१८ अशा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याचा निर्णय जादा डावावर गेला. तिथे विहंग संघाने चुका सुधारत ८ गुणांची कमाई केली, तर त्यांच्या संरक्षण फळीने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजयात मोलाचा वाटा
विहंग क्रीडा मंडळाच्या गजानन शेंगाळ याने तीनही डावात उत्कृष्ट संरक्षणासह ३ गुण, लक्ष्मण गवस याने २१.१० मिनिटे पळतीचा खेळ करत ४ गुणांची नोंद केली. तसेच आकाश तोगरे याने उत्कृष्ट संरक्षणासह ३ गुणांची कमाई केली. पराभूत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी संघाकडून ऋषिकेश मुर्चावडे, प्रतीक देवरे, दीपक माधव यांनी जबरदस्त प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळू शकले नाही.
महिला गट : एका गुणाच्या फरकाने थरारक विजय
महिला गटातील अंतिम सामना देखील चुरशीचा ठरला. पहिल्या डावात ४-३ अशी नाममात्र आघाडी घेतलेल्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी संघाने दुसऱ्या डावातही तितकेच गुण मिळवत ७-६ अशा एका गुणाने निसटता विजय मिळवला.
विजयात चमकदार कामगिरी
शिर्सेकर्स संघाच्या देविका अहिरे, साक्षी वाफेलकर, सिद्धी देवळेकर, साक्षी पार्सेकर यांचा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. शिवभक्त संघाकडून रेश्मा राठोड, ऋतिका सोनावणे, कविता घाणेकर यांची झुंज उल्लेखनीय ठरली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
सर्वोत्तम संरक्षक : ऋतिका सोनावणे (शिवभक्त क्रीडा मंडळ), दीपक माधव (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी).
सर्वोत्तम आक्रमक : साक्षी पार्सेकर, विजय देठे (विहंग क्रीडा मंडळ).
सर्वोत्तम अष्टपैलू : साक्षी वाफेलकर (शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी), आकाश तोगरे (विहंग क्रीडा मंडळ).