
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित आत्माराम मोरे स्मृती चषक टी २० आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत त्यांनी जे जे हॉस्पिटल संघाचा ३ विकेटने पराभव करत मोठा विजय साजरा केला. कर्णधार प्रदीप क्षीरसागर, मनोज कांबळे आणि प्रफुल मारूच्या आक्रमक खेळीने हा विजय सुकर झाला.
ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकत जे जे हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. जे जे हॉस्पिटल संघाचा डाव १९.४ षटकांत १०८ धावांत संपुष्टात आला. सलामीवीर जगदीश वाघेला (२६), प्रकाश सोळंकी (२०), अमोल दरेकर (२१) आणि रोहित सोळंकी (१० नाबाद) यांनी संघाचा डाव सावरला. प्रफुल मारूने ४ बळी घेत फिरकीचा जाळ पसरवला, तर शंतनू मोरेनेही २ बळी घेत अचूक गोलंदाजी केली.
मनोज कांबळे आणि क्षीरसागरची चमकदार कामगिरी
लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाची आठव्या षटकातच ५ बाद ४१ अशी गंभीर स्थिती होती. मात्र, मनोज कांबळेने २९ चेंडूत ४३ धावा, कर्णधार प्रदीप क्षीरसागरने १७ चेंडूत २० धावा करून संघाला विजय मिळवून दिला. १७.४ षटकांत ७ बाद ११० धावा फटकावत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
फिरकी गोलंदाज प्रफुल मारूला सामनावीर पुरस्कार, तर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रोहित सोळंकीला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात एमआयजीचे सेक्रेटरी भास्कर शेट्टी, क्रिकेटप्रेमी जयसुख झवेरी, राजेश शाह, अशोक चंद्रावत आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.